सुधाकर काशीद,कोल्हापूर
मोर्चा आहे मग जमायचं कोठे? चला टाऊन हॉलमध्ये….बैठक आहे मग बसायचे कोठे? आहे की, टाऊन हॉल…! दिवसभर काही काम नाही भर उन्हात थंडावा मिळणार कुठे चला पडूया. टाऊन हॉलमध्ये..! आणि निवांत बसून गांजा, नशा पाणी करायचे आहे .आडोसा कुठे आहे? आहे की टाऊन हॉल मध्ये…!अशी अवस्था कोल्हापुरातील सर्वात जुन्या, हिरवाईने समृद्ध आणि शहराच्या मध्यभागी सात एकरात पसरलेल्या टाऊन हॉल उद्यानाच्या वाट्याला आली आहे. ज्या उद्यानाची आठवण पर्यावरण, निसर्ग, हिरवाई, शितलता, ऑक्सिजन पार्क, कोल्हापूरचा इतिहास या अंगाने यायला हवी त्या उद्यानाची मुळ ओळखच विसरली गेली आहे. ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी त्याची अवस्था झाली आहे. समृद्ध ….अतिशय समृद्ध अशीच आठवण याची ओळख जपण्यासाठी कोल्हापूरकरांनीच आता एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोल्हापुरातील टाऊन हॉल म्हणजे संस्थान आणि ब्रिटिश काळातील अमूल्य अशी एक देणगी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात तब्बल सात एकर परिसरात हे उद्यान पसरले आहे. आता या टाऊन हॉलमधील वास्तुत पुरातन वस्तू संग्रहालय आहे कोल्हापूरचा दोन हजार वर्षापासूनचा अस्सल इतिहास या ठिकाणी अगदी डोळ्यासमोर पाहण्यासाठी खुला आहे. येथे वस्तू संग्रहालय व्हायच्या आधी तत्कालीन ब्रिटिश अधिकारी त्यांचा परिवार त्यांचे सहकारी यांच्यासाठी ही वास्तू होती. तेथे त्यांचे एकत्रित कार्यक्रम होत होते. किंबहुना तो त्या काळातला ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या परिवाराचा क्लब होता.
या उद्यानातील प्रत्येक झाड वेगवेगळ्या जातीचे आहे. अनेक झाडे परदेशातील आहेत. प्रत्येक झाडाचा वेगळा नैसर्गिक औषधी गुणधर्म आहे. या उद्यानात फिरणे हा एक व्यायाम आहेच. पण या सर्व विविध गुणी झाडाच्या सानिध्यात फिरणे याचा देखील शरीराला, मनाला एक वेगळाच फायदा असल्याचा अनुभव आहे. या उद्यानात एक बँड स्टँड आहे. पूर्वी तेथे दर रविवारी पोलीस बँड वाजवला जात होता. या बँक स्टॅन्डची रचना अशी की, आवाजाला एक किनार (इको )आजही लाभते.
उद्यानात एक विहीर होती. कुकुटेश्वर तीर्थ म्हणून त्याची ओळख होती. पण अक्षरश: रोज थोडा थोडा कचरा टाकून ही विहीर मुजवली गेली. पण आजही जेथे संधी मिळेल तेथून या विहिरीचे पाणी बाहेर पडते. आणि 24 तास खळखळ वाहत जाऊन थेट गटारीला जाऊन मिळते.
इतके समृद्ध उद्यान असूनही त्याची समृद्धता कोल्हापूरकरांना कळालेलीच नाही. त्यामुळे या उद्यानात सकाळी फिरायला येणारे लोक वगळता दिवसभर उद्यानाचे अस्तित्व कोरडेच असते. मोर्चा, बैठका, सभा यासाठी बिनधास्त हे उद्यान वापरले जाते. क्षणभर हे देखील ठीक आहे. पण या उद्यानात शासकीय ग्रंथालय, गव्हर्नमेंट प्रेसच्या अनेक खोल्या रिकाम्या आहेत. त्याची दारे मोडून गांजा ओढणाऱ्यांनी आडोसा शोधला आहे. गांजासाठी वापरल्या जाणाऱ्या सिगारेट , विडी, कापूस, चिंध्या, चांदीचा वर्ख, काड्यापेट्या, दारूच्या बाटल्या, ग्लास, पत्रावळी याचा ढिग त्या ठिकाणी पडला आहे .गांजा पिणाऱ्यांची दहशत अशी की वॉचमन फक्त नावालाच राहिले आहेत. त्यातला वॉचमन हा खूप शेवटचा घटक. पण या उद्यानात उद्यान विभागाचे शासकीय कार्यालय आहे.त्याची अवस्थाही अतिशय केविलवाणी आहे.
या साऱ्या परिस्थितीत टाऊन हॉल आपले मूळ अस्तित्व हरवून बसला आहे. आपण कोल्हापूरकर या आपल्या ठेव्याकडे कसे पाहतो यावर टाउन हॉलचे भवितव्य अवलंबून आहे. भविष्यात कधीतरी त्याचे खाजगीकरण झाले. तर त्यात आश्चर्य नसणार आहे. कारण या उद्यानात 22 कर्मचारी होते. पण एक एक कर्मचारी निवृत्त होऊन आता फक्त चौघेजण उरले आहेत. एकही नवा कर्मचारी गेल्या वीस वर्षात भरलेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे हिरव्यागार सावलीच्या टाऊन हॉलवर खाजगीकरणाचे काळे सावट अगदी ठळकपणे जाणवू लागले आहे.
Previous Articleडिलिव्हरी ‘सीपीआर’मध्ये, बाळ ‘प्रायव्हेट’मध्ये..!
Next Article थेट पाईपलाईनला वाकडे वळण : राजकीय डावपेचांचा खो..!









