रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी : पॅसेंजरला दिला एक्स्प्रेसचा दर्जा
बेळगाव : रेल्वेने 2014 पासून पॅसेंजर रेल्वेच्या तिकिटात दरवाढ केली नाही. परंतु पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा देत दरवाढ केली आहे. कोरोनानंतर रेल्वेने हा बदल केला आहे. रेल्वेची गती व थांबे सारखेच असताना केवळ एक्स्प्रेस म्हणून टॅग लावून रेल्वे सुरू आहेत. यामुळे रेल्वेकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत. कोरोनानंतर 2022मध्ये पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यात आल्या. परंतु त्यानंतर त्यांना एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला. यामुळे तिकीट दरात दुपटीने वाढ झाली. उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राला जोडणारी पॅसेंजर रेल्वेसेवा गरिबांची जीवनरेखा आहे. हुबळी ते मिरज यादरम्यान अनेक अनारक्षित एक्स्प्रेस धावत असतात. परंतु वाढलेल्या तिकीट दरामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पॅसेंजर रेल्वेला एक्स्प्रेसचा दर्जा केवळ नावालाच आहे. रेल्वेची गती तसेच थांबे समानच असून केवळ तिकीट वसुलीसाठीच प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. जो प्रवास 40 ते 50 रुपयात होत होता, त्यासाठी आता 80 ते 90 रुपये मोजावे लागत आहेत. दररोज अनारक्षित एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने सर्वांनाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एक्स्प्रेसचा तिकीट दर आणि बसचा तिकीट दर समान झाल्यामुळे रेल्वेपेक्षा बस परवडते, म्हणण्याची वेळ आली आहे. पॅसेंजरपेक्षा एक्स्प्रेसचे तिकीट 40 ते 50 टक्के अधिक दराने दिले जात असल्याने रेल्वे तीच, प्रवासाचा वेळही तितकाच, मग वाढीव तिकीट दर का द्यायचा? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.









