मालवण, देवगड, रत्नागिरीतून बेळगाव बाजारात आंबा दाखल
बेळगाव : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यांची आवक वाढू लागली आहे. होलसेल फळबाजारात कोकणातील मालवण, देवगड आणि रत्नागिरी येथून आंबा दाखल होऊ लागला आहे. त्यामुळे फळबाजार आंब्यांनी बहरताना दिसत आहे. मात्र, दर सर्वसामान्यांच्या आवाक्मयाबाहेर असल्याचे दिसत आहे. साधारण आंबा एक हजार ऊपये डझन झाला आहे. होलसेल फ्रूट मार्केटबरोबर किरकोळ बाजारात आंबा विक्री होऊ लागला आहे. आंब्याच्या दर्जानुसार दर आहेत. एक डझन आंबा हजार ते दोन हजारपर्यंत विकला जात आहे. दर अधिक असल्याने सर्वसामान्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, कर्नाटकाचा आंबा दाखल झाल्यानंतर दर काहीसे कमी होतील, अशी आशा ग्राहकांना आहे. अद्याप होलसेल फळबाजारात स्थानिक आणि कर्नाटकचा आंबा दाखल झाला नाही. केवळ कोकणातील आंबा येऊ लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे सफरचंद, डाळिंब, पेरू, संत्री, मोसंबी, अननस, कलिंगड आदी फळांची बाजारात रेलचेल पाहावयास मिळत आहे. शिवाय आंब्याची चव चाखण्यासाठी काहीजण आंबा खरेदीला पसंती देऊ लागले आहेत. होलसेल फ्रूट मार्केटमध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ आणि इतर राज्यांतून फळांची आवक होते. यापैकी आंब्याची आवक केवळ कोकणातून अधिक प्रमाणात होते. दरम्यान, बाजारात कोकणातील हापूस आंब्याला मागणी अधिक असते. होलसेल फळबाजारात आंबा दाखल झाला आहे. शिवाय इतर ठिकाणी विक्रीसाठी जाऊ लागला आहे.
कोकणातील आंबा दाखल
आंब्यांची आवक वाढली आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे मार्केट थंडावले होते. मात्र, यंदा आंब्यांची विक्री वाढेल, कोकणातील आंबा दाखल होऊ लागला आहे आणि विक्रीही सुरू झाली आहे. दर येत्या काही दिवसात कमी होतील.
विकास तानवडे, व्यापारी, होलसेल फ्रूट मार्केट
बाजारात लिंबू दरात वाढ

वाढत्या उष्म्यामुळे शरीराची लाही लाही होऊ लागली आहे. त्यामुळे लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी दर भरमसाट वाढू लागला आहे. पाच ऊपयांना एक लिंबू अशी विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. मागील आठवड्यात दहा ऊपयांना तीन-चार लिंबू अशी विक्री सुरू होती. मात्र, आता पुरवठा कमी आणि मागणीत वाढ झाल्याने दर वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. दरम्यान, दुपारच्या वेळेत लिंबू सरबत आणि लिंबू सोडा विक्रीसाठी लिंबूची मागणी वाढू लागली आहे. जसजसे तापमान वाढेल तसतसे लिंबूची विक्री वाढत आहे. किरकोळ बाजारात विव्रेत्यांकडून पाच-सहा ऊपयांना एक लिंबू दिला जात आहे. आधीच महागाईने जनता होरपळून गेली आहे. त्यातच दैनंदिन वस्तुंच्या किमतीही वाढू लागल्याने सर्वसामान्यांसमोर चिंता वाढली आहे. बदलत्या हवामानामुळे लिंबू बागायतीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे लिंबूचे दर भरमसाट वाढले आहेत. लहान लिंबू पाच ऊपयांना तर मोठा लिंबू 8 ऊपयेप्रमाणे विकला जात आहे. येत्या दिवसात उष्मा वाढल्यास दर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.









