अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाची कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरविणाऱ्या रिक्षाचालकास अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. हनुमंत दिलीप खर्जे (वय 32 रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे त्याचे नांव आहे. तसेच अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या एका महिलेसही या पथकाने अटक केले. नफिसा समीर दानवाडे (रा. गोकुळ चौक, इचलकरंजी) असे तिचे नांव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिह्यात काही लॉज, मसाज सेंटरला वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकास मिळाली होती. त्यानुसार शोध घेतला असता, राजेंद्रनगर येथील हनुमंत खर्जे हा त्याच्या रिक्षातून काही तरुणी पुरवत असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी सकाळी त्याला कासारवाडी येथे सापळा रचून अटक करण्यात आली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याने पथकाने त्याचा ताबा शाहूपुरी पोलिसांकडे दिली.
दरम्यान, नफिसा समीर दानवाडे (रा. गोकुळ चौक, इचलकरंजी) या महिलेने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दाखल होता. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावरून तिला पथकाने ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी तिचा ताबा कुरुंदवाड पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण, सहायक फौजदार रवींद्र गायकवाड, पोलिस हवालदार आनंदराव पाटील, अभिजीत घाटगे सायली कुलकर्णी, किरण पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.