नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागांमध्ये चीनशी होत असलेल्या संघर्षाला पूर्ण विराम देण्यासाठी त्या देशाशी चर्चा केली जाणार आहे. हा तणाव तीन वर्षांपासून सुरु आहे. सेनापातळीवर ही बोलणी होणार असून या चर्चेचे उत्तरदायित्व लेफ्टनंट जनरल रशिम बाली यांच्याकडे देण्यात आले आहे. बाली यांनी सोमवारी भारताच्या 14 व्या कोअर कमांडची सूत्रे स्वीकारली आहेत. या कमांडला ‘फायर अँड फ्युरी’ असेही नाव आहे. पूर्व लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे नियंत्रण याच कमांडकडे असते. लेफ्टनंट जनरल बाली यांच्याकडे यापूर्वी धोरणात्मक योजना नियोजन विभाग होता. आता त्यांची पदोन्नती या कमांडवर करण्यात आली आहे. आतापर्यंत चीनशी चर्चेच्या अनेक फेऱया झाल्या असून त्या अल्प प्रमाणात यशदायी ठरल्या असल्या तरी अद्याप सीमेवरील तणाव नाहीसा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांची ही नियुक्ती महत्वपूर्ण मानली जात आहे.









