कुत्रा हा अत्यंत इनामी आणि विश्वासू प्राणी असतो, असा बहुतेकांचा अनुभव आहे. माणसाचा सहवास कुत्र्याला आवडतो आणि तो प्राण गेला तरी मालकाशी प्रामाणिक राहतो, अशी त्याची ख्याती आहे. तथापि काही वेळा श्वान याच्या विपरित वागतात. असा अनुभव आयनी शिल्ड्स नामक एका महिलेला आला आहे. त्यांचे वय 67 वर्षांचे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पिटबुल नामक प्रजातीच्या एका कुत्र्याचा जीव वाचवून त्याला पाळले होते. कौतुकाने त्यांनी कुत्र्याचे नामकरणही केले. काही दिवसांपर्यंत सर्व काही ठिक चालले होते.

मात्र, मागच्या आठवडय़ात ध्यानीमनी नसताना आणि त्या घरात एकटय़ा असताना हा कुत्रा आक्रमक बनला आणि त्याने आयनी यांच्यावर हल्ला चढवून त्यांचे नाक आणि चेहऱयाचे चावे घेतले. हात आणि डोकेही जखमी केले. नंतर त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यात आले. तथापि, खोलवर जखमा झाल्याने उपचार करूनही त्यांचा मृत्यू झाला. कुत्र्याने आपल्या मालकाचा असा प्राण घेण्याचे हे उदाहरण अत्यंत दुर्मीळ असावे, असे तज्ञांचेही मत आहे. कुत्रे काही वेळेला मालकांना जखमी करतात. तथापि, सहसा अशा हल्ल्यांमध्ये त्यांचा जीव जात नाही. पण या महिलेने मात्र कुत्र्यावर दया दाखवून स्वतःचा जीव गमावला.
वास्तविक आयनी शिल्ड्स यांना हा कुत्रा स्वतःजवळ बाळगायचा नव्हता. तथापि, भटक्या कुत्र्यांना आसरा देणाऱया घरांमध्ये त्यावेळी जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याला आपल्याकडे पाळण्याचा निर्णय घेतला होता. अपवादात्मक अशी घटना घडत असली तरी प्राण्यांवर दया दाखविण्याचे कार्य थांबविले जाऊ नये, असे आवाहन या घटनेनंतर तज्ञांनी केले आहे.









