शाकाहारी वन्यप्राणी आपल्या पिलांच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी आपला स्वभाव धर्म विसरून अत्यंत हिंस्र प्राण्यांविरोधातही जोरदार आघाडी उघडतात. परिणामांचा विचार न करता स्वतःचा जीव धोक्मयात घालून अशा हिंस्र प्राण्यांवर प्रतिहल्ला चढवितात आणि कित्येकदा त्यांना पळवून लावून आपल्या नव्या पिढीचे संरक्षण करतात, असे नेहमी दिसून येते. अस्तित्वासाठी चाललेले असे अनेक संघर्ष वन्यजीवनात घडत असलेले आपल्याला युटय़ूबवरून पाहता येतात.
सध्या इन्स्टाग्रामवरती अशीच एक पोस्ट अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. यात एक जिराफीण आपल्या पिलाच्या संरक्षणासाठी सिंहिणीवर हल्ला करत असल्याचे रेकॉर्डिंग पहावयास मिळते. जिराफीणीच्या या पिलाला सिंहिणीने पकडले आणि ती त्या पिलाच्या मानेचा चावा घेणार इतक्मयात जिराफीणीने मागे वळून तिच्यावर जोरदार हल्ला चढविला. जिराफाला नखे किंवा तत्सम धारदार अवयवांची सोय उपलब्ध नसली तरी त्यांच्या पायात जबरदस्त ताकद असते. एका लाथेत ते त्यांच्यापेक्षा बळकट प्राण्याचे कंबरडे मोडू शकतात. या जिराफीणीनेही सिंहिणीवर लाथांचा वर्षाव करून तिला तेथून घालवून दिले आणि नंतर ती आपल्या पिलाला घेऊन मार्गस्थ झाली, असे या व्हिडिओमध्ये दिसून येते. जिराफीणीचा हा आक्रमक पवित्रा पाहून सिंहिणीला अखेर त्या पिलाला सोडून जंगलात धूम ठोकावी लागली. अपत्यप्रेम ही केवळ माणसाची मक्तेदारी नाही तर पशुही त्यासाठी वेळप्रसंगी आपल्या स्वभावधर्माच्या विरुद्ध वागतात, असे या घटनेवरून दिसून येते.









