भारताला पहिल्या डावात 91 धावांची आघाडी, अक्षर पटेलचे शानदार अर्धशतक, लायन-मर्फीचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
सुमारे 40 महिन्यांची प्रतीक्षा संपुष्टात आणत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 28 वे कसोटी शतक तसेच अक्षर पटेलने शानदार अर्धशतक नोंदवल्याने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर 91 धावांची आघाडी घेता आली. भारताचा पहिला ग्न571 धावांत आटोपल्यानंतर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात बिनबाद 3 धावा जमविल्या. सामना अनिर्णीत होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केल्यास भारताला विजयाची संधी मिळू शकते.
भारतीय धावसंख्येत शुबमन गिल व कोहलीच्या एपिक शतकांचा प्रमुख वाटा आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा जमविल्या आहेत. खेळपट्टी थोडीशी टर्न होऊ लागल्याने तसेच त्यात बाऊन्सही असल्याने भारतीय गोलंदाजांना अखेरच्या दिवशी थोडीशी संधी आहे. मात्र फलंदाज त्यांचा मुकाबला करू शकणार नाहीत, इतकी ती धोकादायक बनलेली नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहण्याची जास्त शक्यता आहे आणि निकाली झालाच तर भारताच्या बाजूनेच तो असेल. असे झाल्यास भारत ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. त्यासाठी भारताला लंका-न्यूझीलंड मालिकेच्या निकालाची प्रतीक्षाही करावी लागणार नाही.

कोहलीचे 75 वे आंतरराष्ट्रीय शतक
मोटेरावर रविवारी सुमारे 15000 प्रेक्षकांना कोहलीच्या बहुप्रतीक्षित 28 व्या शतकाचा साक्षीदार होण्याचा संस्मरणीय योग लाभला. मिडविकेटच्या दिशेने लायनला फटका मारत शतक पूर्ण केल्यानंतर प्रेक्षक, संघसहकाऱयांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली. त्यानेही सर्वांना अभिवादन करीत त्याचा स्वीकार केला. नोव्हेंबर 2019 नंतर तब्बल 1204 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्याने हे 75 वे आंतरराष्ट्रीय शतक नोंदवले. 241 चेंडूत त्याने ही शतकी मजल मारली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे हे आठवे शतक असून या संघाविरुद्ध त्याने नेंदवलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. शतकानंतर त्याने फार मोठा जल्लोष केला नाही. त्याने नेहमीप्रमाणे एंगेजमेंट रिंगचे चुंबन घेतले. मोठे ओझे उतरल्याने समाधानाचे हास्य मात्र त्याच्या चेहऱयावर दिसत होते.
कोहलीचा निर्धारी खेळ
त्याचे हे शतक वेगळय़ा पद्धतीचे होते. ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडूवर वरचेवर बाद होत असल्याने त्याने सावध खेळ करीत त्या बाजूने आक्रमक फटके मारणे टाळले आणि शतक पूर्ण झाल्यानंतरच त्याने कव्हर ड्राईव्हचा फटका मारला. अनेकांना सचिन तेंडुलकरने 2004 मध्ये सिडनीत शिस्तबद्ध खेळ करीत नोंदवलेल्या नाबाद 241 धावांच्या खेळीची आठवण झाली. सचिनने त्यावेळी निग्रही खेळ करीत ऑफकडील फटके मारणे कटाक्षाने टाळले होते. अतिशय तंदुरुस्त असलेल्या कोहलीने आपल्या खेळीत 84 एकेरी, 18 दुहेरी आणि दोनदा तीन धावा पळून काढल्या. त्याच्या खेळीत 15 चौकारांचा समावेश होता. सकाळच्या पहिल्या सत्रात त्याने एकही चौकार मारला नाही. शतकापर्यंत त्याने एकेरी-दुहेरी धावा घेण्यावरच भर दिला. शतक पूर्ण झाल्यानंतर मात्र त्याने पुढच्या 86 धावांत 10 चौकार ठोकले. 140 धावानंतर त्याने पहिला कव्हर ड्राईव्ह ग्रीनच्या गोलंदाजीवर मारला.
श्रेयसला दुखापत
श्रेयस अय्यरच्या पाठीची दुखापत पुन्हा उद्भवल्याने तो फलंदाजीस येऊ शकला नाही. त्यामुळे कोहली शेवटच्या गडय़ाच्या रूपात बाद झाल्यानंतर भारताचा डाव संपुष्टात आला. कोहली 8 तास 36 मिनिटे खेळपट्टीवर होता. त्याचे द्विशतक 14 धावांनी हुकल्याने त्याच्यासह सर्वांनाच हळहळ वाटली. बाद झाल्यानंतर तंबूत परतत असताना प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्ह स्मिथ व स्पिनर टॉड मर्फी आणि अन्य सहकाऱयांनी कोहलीचे अभिनंदन करीत त्याच्याशी शेकहँड केले. प्रेक्षकांनीही त्याला उभे राहून टाळय़ांच्या गजरात मानवंदना दिली.
कोहलीने या खेळी दरम्यान महत्त्वाच्या भागीदारीही केल्या. सहाव्या गडय़ासाठी मात्र त्याने अक्षर पटेलसमवेत 162 धावांची केलेली भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. अक्षर पटेलने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करीत 113 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांसह 79 धावा काढल्या. भारताच्या पहिल्या सहा गडय़ासाठी अर्धशतकाहून अधिक धावांच्या भागीदारी नोंदवल्या. पहिल्या सत्रात मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व ठेवत 32 षटकांत केवळ 73 धावा दिल्या होत्या.
यष्टिरक्षक कोना भरतने या डावात चांगली फलंदाजी करीत 88 चेंडूत 44 धावा जमविल्या. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार, 3 षटकार मारले. उपाहारानंतर त्याने ग्रीनवर आक्रमण करीत पुल व हुकचे षटकार मारले. लायनला त्याने स्लॉग स्वीपचा सुंदर षटकारही मारला. शॉर्ट लेगवर तो लायनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियातर्फे लायन व मर्फी यांनी प्रत्येकी 3 तर स्टार्क व कुहनेमन यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प.डाव सर्व बाद 480, भारत प.डाव 178.5 षटकांत सर्व बाद 271 ः रोहित शर्मा 35 (58 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), गिल 128 (235 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), पुजारा 42 (121 चेंडूत 3 चौकार), कोहली 186 (364 चेंडूत 15 चौकार), जडेजा 28 (84 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), श्रीकर भरत 44 (88 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), अक्षर पटेल 79 (113 चेंडूत 5 चौकार, 4 षटकार), अश्विन 7, उमेश यादव 0, शमी नाबाद 0, श्रेयस अय्यर दुखापतीमुळे खेळला नाही, अवांतर 22. गोलंदाजी ः नॅथन लायन 3-151, मर्फी 3-113, स्टार्क 1-97, कुहनेमन 1-94.
ऑस्ट्रेलिया दु.डाव 6 षटकांत बिनबाद 3 ः कुहनेमन खेळत आहे 0, हेड खेळत आहे 3.
कोहलीची 75 आंतरराष्ट्रीय शतके
प्रकार सामने धावा सर्वोच्च शतके
कसोटी 108 8416 ना.254 28
वनडे 271 12809 183 46
टी-20 115 4008 ना.122 01
एकूण 494 25233 ना.254 75









