बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतला दणका, राज्य माहिती आयोगाने घेतली दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या पिडीओंनी आरटीआय कार्यकर्त्याला कामासाठी खर्च केलेल्या रकमेची योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे आरटीआय कार्यकर्त्याने बेंगळूर येथील राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी संबंधित आरटीआय कार्यकर्त्याला चार आठवड्यात संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत पीडीओंना चांगलाच दणका बसला आहे.
बेळगाव-बेनकनहळ्ळी रस्त्यावर पथदीप बसविण्यात आले होते. ते पथदीप बसविताना ग्राम पंचायतीने नियमानुसार काम केले नव्हते. याचबरोबर खर्च किती केला आहे, याचा तपशील मागविण्यात आला होता. मात्र ग्राम पंचायत पिडीओंनी अर्धवट माहिती दिली. यामुळे आरटीआय कार्यकर्ते शिवाजी पाटील यांनी बेंगळूर येथील माहिती आयोग आयुक्तांकडे तक्रार केली होती.
त्याची दखल आयुक्तांनी घेतली असून संबंधीत ग्राम पंचायतीला चार आठवड्यामध्ये संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीचे पिडीओंना आता संबंधित आरटीआय कार्यकर्त्याला माहिती द्यावी लागणार आहे. राज्याच्या माहिती आयोग आयुक्तांनी दखल घेतल्यामुळे अधिकारी व ग्राम पंचायतमधील सदस्यांनाही चांगलाच दणका बसला आहे.









