वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेच्या महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेला 15 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धा 26 मार्चपर्यंत चालणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताची अव्वल महिला मुष्टीयोद्धी निखात झरीनने आपले लक्ष केवळ सुवर्णपदकावर ठेवले आहे.
महिलांच्या 50 किलो वजन गटात आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेच्या विश्व महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेतील निखात झरीन ही विद्यमान विजेती आहे. दिल्लीत सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी आपण जोरदार सरावर केला असून आता माझे ध्येय सुवर्णपदक मिळवण्यासाठी राहिल असे निखात झरीनने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या स्पर्धेसाठी भारतीय महिला मुष्टीयुद्ध संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये 75 किलो वजन गटात लोव्हलिना बोर्गोहेनचा समावेश असून तिने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी नितू घनघास 48 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. या स्पर्धेसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 20 कोटी रुपयांची राहिल. सुवर्णपदक विजेत्यांसाठी 10 कोटी रुपये तर रौप्यपदक विजेते तसेच कास्यपदक विजेत्यांसाठी प्रत्येक वजन गटातील स्पर्धकांसाठी अनुक्रमे प्रत्येकी 5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
भारतीय मुष्टीयुद्ध संघ : नितू घनघास, निखात झरीन, साक्षी चौधरी, प्रीती, मनीषा मौन, जस्मीन लंबोरिया, शशी चोप्रा, मंजू बांबोरिया, सेनामाचा चानू, लव्हलिना बोर्गोहेन, स्वाती बोरा आणि नुपूर शेरॉन.