वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानच्या बाल्ख प्रांतात शनिवारी एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या स्फोटाने हाहाकार निर्माण झाला. या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. मजार-ए-शरीफ शहरात सकाळी 11 वाजता ही घटना घडली. सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नव्हती. तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद आसिफ वजिरी यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे जास्त जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, पत्रकारांना टार्गेट करून हा स्फोट घडवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.









