इस्लामाबाद / वृत्तसंस्था
काश्मीर प्रश्न पुन्हा संयुक्त राष्टसंघाच्या मध्यवर्ती स्थानी आणणे हे दुरापास्त काम आहे, अशी कबुली पाकिस्तानने दिली आहे. या देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुत्तो यांनी पाक वृत्तमाध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत हीं बाब स्पष्ट केली. काश्मीर जनतेची स्थिती आणि पॅलेस्टाईन जनतेची स्थिती यात बरेच साधर्म्य आहे, अशी पुस्ती मात्र त्यांनी या मुलाखतीत जोडली आहे.
पाकिस्तानच्या काश्मीरसंबंधीच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणाकडूनही समर्थन मिळत नाही, ही खरी अडचण आहे. विश्वसमुदायाचे या प्रश्नावर समर्थन मिळविण्यात पाकिस्तानला मोठे अपयश आले आहे. सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य देश या प्रश्नावर पाकिस्तानचे समर्थन करीत नाहीत. तर सुरक्षा परिषदेचे इतर सदस्यदेशही पाकिस्तानची या प्रश्नावरची स्थिती लक्षात घेत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहाच्या केंद्रस्थानी आणणे हे अतिशय अवघड काम बनले आहे, असे प्रतिपादन त्यांनी या मुलाखतीत केले आहे.