On the occasion of Shiv Jayanti, saffron was hoisted on Ramgad fort
दुर्गवीर प्रतिष्ठानचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती आयोजित करण्यात आली होती. यावेळी रामगडावर वास्तुफलक आणि भगवा झेंडा फडकवण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात रामगड ग्रामस्थ भालचंद्र पवार यांच्या हस्ते गडपूजनाने झाली.तद्नंतर मालवण तहसीलदार श्री. श्रीधर पाटील सर यांच्या हस्ते मुख्य दरवाजा आणि पश्चिमेकडील बुरुजावर हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगव्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रगत विद्यामंदिर रामगड च्या विद्यार्थ्यांची उपस्थित उत्स्फूर्त होती. उपस्थित सर्वांना संपूर्ण गडफेरी करत गड दाखविण्यात आला तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या संवर्धन कार्याची माहिती देण्यात आली.
छ. शिवाजीमहाराजांच्या जयंती चा मुख्य कार्यक्रम गणेश मंदिरात झाला. यावेळी रामगड सरपंच श्री. शुभम मठकर यांच्या हस्ते गणेशाचे तसेच शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सामुदायिक आरती, ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र, गारद यांमुळे वातावरण शिवमय झाले होते.
यावेळी आपदा मित्र टीम चे वैभव खोबरेकर, प्रज्ञा बागवे, तनुजा गोलतकर तसेच सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी बेसिक लाईफ सपोर्ट या विषयावर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी तहसीलदार पाटील सर यांनी आपल्या मनोगतात दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रामगड किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धन कार्याचे कौतुक केले. तसेच छ. शिवाजी महाराजांना फक्त देव्हा-यात बसवून देव करण्यापेक्षा मनुष्यरूपातील या युगपुरुषाने आपल्या कार्यातून कसे देवत्व प्राप्त केले आहे याचा प्रत्येकाने अभ्यास करत ख-या अर्थाने शिवविचार दैनंदिन व्यवहारात आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार पाटील सर यांनीवतीने उपस्थितांना ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सुनील पवार, मंडल अधिकारी, उपसरपंच राजू जाधव, मोहन घाडीगांवकर, बंडू लाड, अमित फोंडके, रामगड हायस्कूल चे दिनेश सावंत सर, माजी सैनिक दत्तगुरु गावकर, महादेव घाडीगांवकर, अनिल राऊळ, पुर्वा राणे, धनश्री अडसूळ, महेश्वरी कुवळेकर, देवेंद्र घाडीगांवकर, देशमुख सर, सह्याद्री प्रतिष्ठाचे प्रकाश सावंत, योगेश संकपाळ, ऐश्वर्या घाडीगांवकर, मयूर बोंद्रे, दुर्गवीर प्रतिष्ठानचे रवींद्र रावराणे, प्रशांत वाघरे, प्रभाकर परब आणि दुर्गवीर सिंधुदुर्ग चे सर्व दुर्गवीर उपस्थित होते.दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील रामगड, भगवंतगड या किल्ल्यावर संस्थेचे काम चालते. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी दुर्गवीरांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते. रामगड,भगवंतगडावर सातत्याने होत असलेल्या स्वच्छता मोहिमा, गडावरील कार्यक्रम व कार्यामुळे गड पुन्हा एकदा नावारुपास येत आहेत. आपणही छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचे साक्ष असणारे हे गडकिल्ले जपण्यासाठी दुर्गवीर सोबत सहभागी होण्यासाठी चैतन्य आरेकर 9422849146 या नं.शी संपर्क साधून या शिवकार्यास हातभार लावावा असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
मालवण / प्रतिनिधी









