एपीएमसी पोलिसांची कारवाई : दोन मोटारसायकलींसह सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी / बेळगाव
एटीएम मशीनबाहेर पाळत ठेवून वृद्धांना ठकविणाऱ्या आंतरराज्य टोळीतील जोडगोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 6 लाख 9 हजार रुपये किमतीचे दागिने, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे तपास, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या एका युवकावर देशभरात 20 हून अधिक गुन्हे आहेत, अशी माहिती मिळाली आहे. अमोल भगवान शेंडे (वय 32, रा. नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), त्याचा साथीदार श्रवण सतीश मिनजगी (वय 30, रा. केदरनाथनगर, एमआयडीसी, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक रमेश अवजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर कॉलनी येथील सोमलिंग अंमनगी यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या बँक खात्यातील 4 लाख 3 हजार 789 रुपये काढण्यात आले होते. 29 नोव्हेंबर 2022 रोजी या संबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. पोलिसांनी अमोल व श्रवण या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 लाख 39 हजार रुपये रोकड व 3 लाख 60 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा 6 लाख 9 हजार किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.









