ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित : प्रवास होणार सुलभ
प्रतिनिधी / बेळगाव
राज्य मार्ग परिवहन मंडळाने बस वाहतुकीत अत्याधुनिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आता मोबाईलवर बसचे लोकेशन समजणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे. यासाठी टाईम ट्रॅकिंग सिस्टीम प्रायोगिक तत्वावर राबविली जात आहे. दरम्यान, येत्या काळात प्रवाशांच्या मोबाईलवर आपली बस कुठे आहे, हे समजणार आहे. प्रवाशांना बस कधी सुटली? सध्या कोठे आहे? आणि बसस्थानकात कधी येऊन पोहोचणार? याबाबतची सर्व माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर तासन्तास ताटकळत थांबण्याची समस्या दूर होणार आहे. दरम्यान, या नवीन प्रणालीमुळे रात्री उशिराने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासही सोयीस्कर होणार आहे.
बसमध्ये जीपीएस यंत्रणा
या प्रणालीसाठी प्रवाशांना वेगळा अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. तिकीट काढताना प्रवाशांना त्यांचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. दरम्यान, प्रवाशांच्या मोबाईलवर लिंक पाठविली जाणार आहे. या लिंकद्वारे एका क्लिकमध्ये बस कोणत्या रस्त्यावरून येत आहे? सध्या ती कोठे आहे? आणि शहरातील पुढील थांब्यावर पोहोचण्यासाठी अंदाजे किती वेळ लागणार आहे? याबाबतची संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यासाठी बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे.
प्रवाशांच्या वेळेची बचत
परिवहनला बसचे ठिकाण, अधिकृत थांबे, अपघात अशा विविध घडामोडींवर एकाच ठिकाणाहून लक्ष ठेवता येणार आहे. प्रवाशांना लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग सुविधा देण्याचे काम सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. लवकरच प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. बऱ्याच वेळा बसचालक बसथांब्यावर न थांबविताच पुढे जातात, अशा मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. शिवाय प्रवाशांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.









