प्रवास झाला सोयीस्कर : दर अर्ध्या तासाला एक बस
प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकात गुऊवारपासून बेळगाव-कोल्हापूर नॉनस्टॉप बससेवेला प्रारंभ झाला. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे. दरम्यान, येत्या काळात या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद किती मिळतोय, हे आता पाहावे लागणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने या मार्गावर अतिरिक्त नॉनस्टॉप बससेवा सुरू केली आहे. दर अर्ध्या तासाला एक बस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. बेळगाव आणि चिकोडी आगारांतून दररोज 12 बसेस धावणार आहेत. विशेषत: सकाळी 7 ते सायं. 6.30 वाजेपर्यंत ही बससेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता जलदगतीने होणार आहे. पहिल्या दिवशी या बससेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी येत्या काळात प्रवासी वाढतील, असा विश्वास परिवहनला आहे.
बेळगाव बसस्थानकातून धावणाऱ्या बसेस हत्तरगी, संकेश्वर आणि निपाणी बसस्थानकातून कोल्हापूरकडे जात होत्या. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात होता. मात्र, आता बेळगाव ते थेट कोल्हापूर विनाथांबा बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे बेळगावातून थेट कोल्हापूरला जाणे अधिक सोयीचे झाले आहे. बेळगाव-कोल्हापूर मार्गावर नॉनस्टॉप बससेवा सुरू करा, अशी मागणी प्रवाशांतून होत होती. याला प्रतिसाद देत परिवहनने या मार्गावर नॉनस्टॉप बससेवा सुरू केली आहे. या आंतरराज्य बससेवेला प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो, हे आता पाहावे लागणार आहे. या मार्गावर बेळगावातून कोल्हापूरकडे 25 तर कोल्हापूरातून बेळगावकडे बसेसच्या 25 फेऱ्या होणार आहेत. दर अर्ध्या तासाला दोन्ही बसस्थानकांतून बस धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.









