माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचा विश्वास : मांजरी येथे भाजप विजय संकल्प यात्रा
मांजरी : भाजपच्या विजय संकल्प यात्रेतील प्रतिसाद पाहून आगामी निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास वाटत आहे. भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करून आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला अधिकार मिळवून देण्याचा आपला संकल्प केला आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत राज्यात व देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा हवा. भारतीय जनता पक्षाची विजयी पताका चिकोडी विधानसभा मतदारसंघात फडकवावी. निवडणूक लढवणार नसलो तरी भाजपसाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले.
मांजरी येथे भारतीय जनता पक्षाच्या चिकोडी सदलगा विधानसभा मतदार संघात आयोजित विजय संकल्पयात्रेप्रसंगी आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. य् ाावेळी व्यासपीठावर बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, निपाणीच्या आमदार व मंत्री शशिकला जोल्ले, माजी मंत्री व केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे कार्यदर्शी सी. टी. रवी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, चिकोडी सदलगा भारतीय जनता पक्षाचे प्रभारी एम. बी. जिरली, विधान परिषदेचे माजी सदस्य अऊण शहापूरकर, माजी मंत्री शशिकांत नाईक, चिकोडी जिल्हा भाजपाचे अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली उपस्थित होते. प्रास्ताविक माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी केले.









