इंदूरमधील पराभवानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीने केलेली टीका लावली उडवून
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
इंदूरमध्ये अतिआत्मविश्वासामुळे भारतीय संघाचा पराभव झाल्याचे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्राrने व्यक्त केले होते. त्याला कर्णधार रोहित शर्माने ‘बकवास’ म्हटले आहे. शास्त्राrला ‘बाहेरची’ व्यक्ती असे संबोधण्यासही त्याने मागेपुढे पाहिले नाही. 2014 पासून सातपैकी सहा वर्षे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद शास्त्रीने सांभाळले होते.
थोडीशी आत्मसंतुष्टता, थोडासा अतिआत्मविश्वास असेच घडवू शकते. त्यात तुम्ही गोष्टी गृहीत धरता. तुम्ही बेसावध राहा आणि हा खेळ तुम्हाला खाली जमिनीवर आणेल, असे तिसऱ्या कसोटीत फिरकीस पोषक खेळपट्टीवर भारताचा ऑस्ट्रेलियाने नऊ गडी राखून पराभव केल्यानंतर समालोचन करताना शास्त्राrने म्हटले होते. कर्णधार रोहितने गेल्या 18 महिन्यांत संयम राखलेला असला, तरी तिसऱ्या कसोटीतील भारताच्या कामगिरीचे माजी मुख्य प्रशिक्षकाने केलेल्या मूल्यांकनाबद्दल विचारले असता त्याने ठामपणे मते व्यक्त केली.
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास जेव्हा तुम्ही दोन सामने जिंकता आणि बाहेरील लोकांना वाटते की, तुम्ही अतिआत्मविश्वासात आहात तेव्हा ते पूर्णपणे बकवास असते. कारण तुम्हाला सर्व चार सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करायची असते, असे रोहित चौथ्या आणि अंतिम कसोटीच्या पूर्वसंध्येला म्हणाला. ‘तुम्ही दोन सामने जिंकून थांबू इच्छित नाही. तेव्हा हे सर्व लोक जेव्हा अतिआत्मविश्वासाबद्दल बोलतात आणि विशेषत: जेव्हा ते ड्रेसिंग रूमचा भाग नसतात तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये कोणत्या प्रकारची चर्चा होते हे त्यांना कळत नाही, असे रोहित म्हणाला. त्याच्या आधीचा कर्णधार विराट कोहलीची देखील ‘बाहेरच्या’ लोकांवर अशीच प्रतिक्रिया असायची.
आम्हाला सर्व सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करायची आहे आणि जर तो बाहेरच्या लोकांना अतिआत्मविश्वास किंवा तशा प्रकारचे काही वाटत असेल, तर आम्हाला काही फरक पडत नाही, असे उद्गार रोहितने काढले. रवी स्वत: या ड्रेसिंग रूममध्ये राहिलेला आहे आणि त्याला माहीत आहे की, आम्ही खेळतो तेव्हा आमची मानसिकता कशी असते, असे तो पुढे म्हणाला.
बऱ्याच जणांच्या मते, हा आत्मविश्वास चुकीचा आहे, पण भारतीय कर्णधाराच्या मते, तो निर्दयीपणा आहे. ‘हे निर्दयी असणे आणि अतिआत्मविश्वास न ठेवणे याबद्दल आहे. परदेश दौऱ्यावर असताना प्रतिस्पर्ध्यांना एक इंचही न देणे, निर्दयी हा शब्द प्रत्येक क्रिकेटपटूच्या मनात येतो. जेव्हा आम्ही बाहेरचे दौरे केले तेव्हा आम्ही हे देखील अनुभवलेले आहे के, प्रतिस्पर्धी बाजू तुम्हाला कधीही सामन्यात किंवा मालिकेत वरचढ होऊ देत नाही. हीच मानसिकता आमची आहे, असे त्याने सांगितले.









