रंगपंचमी साजरी केल्याने चालकाने घेतला जीव
@वृत्तसंस्था / हैदराबाद
पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये बुधवारी एका हिंदू डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. 60 वर्षीय डॉक्टर धरम देव राठी हे त्वचारोगतज्ञ म्हणून कार्यरत होते. राठी यांची हत्या त्यांचाच वाहनचालक हनीफ लेघारीने केली असून सध्या तो फरार आहे.
डॉक्टर धरम देव यांनी स्वतःच्या मित्रांसोबत रंगपंचमी साजरी केली होती. याचमुळे त्यांचा चालक हनीफ संतप्त झाला होता. रंगपंचमी साजरी केल्यावर घरी परतलेल्या डॉक्टरचा गळा चिरून हनीफने त्यांची हत्या केली आहे.
डॉक्टर राठी हे हैदराबादच्या सिटीजन कॉलनीत वास्तव्यास होते. हत्येच्या घटनेवेळी राठी यांचा आचारी दिलीप ठाकूर देखील घराच्या किचनमध्ये होता. त्यानेच या हत्येची माहिती पोलिसांना दिली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमजद शेख यांनी या हत्येच्या घटनेची पुष्टी दिली आहे. आरोपी हनीफचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
डॉक्टर राठी रंगपंचमी साजरी करून घरी परतल्यावर हनीफने त्यांच्याशी वाद घातला होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. हत्येच्या घटनेनंतर आचारी दिलीपला धक्का बसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हनीफच्या अटकेसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
डॉक्टर राठी हे घरात एकटेच राहत होते. त्यांच्या घरात दोन नोकर आणि एक चालक सेवेत होता. दोन वर्षांपूर्वीच राठी हे पाकिस्तानच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले हेते. त्यांची पत्नी आणि मुले अमेरिकेत वास्तव्यास आहे. काही दिवसांनी राठी हे देखील अमेरिकेत वास्तव्यास जाणार होते. डॉक्टर राठी हे पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रुग्णांवर मोफत उपचार करायचे. सामाजिक कार्यातील योगदानामुळे सिंध सरकारने राठी यांना गौरविले होते.









