नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रंगोत्सवासमवेतच आंतरराष्ट्रीय महिला दिनही साजरा करण्यात येत आहे. बुधवारी या दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समस्त देशवासियांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील सर्वात मोठे गणतंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱया भारताचे राष्ट्रपतीपदावर आपल्या रुपाने एका महिलेची निवड होणे, हे महिल्ना सक्षमीकरणाचे द्योतक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यानिमित्ताने केले.
त्यांनी एका लेखाद्वारे या शुभेच्छा दिल्या आहेत. या देशातील प्रत्येक महिलेची कहाणी हीच माझीही कहाणी आहे. आज देशात महिलांचे सक्षमीकरण मोठय़ा प्रमाणात होत आहे. निर्णय घेण्याचे अधिकार ज्या संस्थांना आहेत, त्यांमध्ये लक्षणीय प्रमाणावर आज महिलांचा सहभाग दिसून येतो. 21 शतकात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात अकल्पनीय प्रगती केली आहे. अनेक देशांमध्ये आजपावेतो एकाही महिलेला राष्ट्रप्रमुखपद मिळालेले नाही. तथापि, जगातील सर्वात मोठे लोकतंत्र अशी ख्याती असलेल्या भारत देशात मात्र आज माझ्या रुपाने एक महिला राष्ट्रपमुख्यपदी विराजमान आहे. हे भारताच्या या क्षेत्रातील प्रगतीचे उदाहरण आहे. आज असंख्य महिला राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात आघाडीवर आहेत. भारतातील महिलांनी साधलेली प्रगती स्पृहणीय आहे, असे प्रतिपादन त्यांनी पेले आहे.
मानसिकता परिवर्तनाची आवश्यकता
महिलांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टीमध्ये व्यापक परिवर्तन होणे आवश्यक आहे. एका शांततापूर्ण आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी स्त्री-पुरुष समानता आणि समान संधी आवश्यक आहे. तसेच महिलांसंबंधी असलेले दूषित पूर्वग्रह दूर करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी लेखात केले आहे. हा लेख सोशल मिडियावरुन प्रसारित करण्यात आला असून सर्वांसाठी उपलब्ध आहे.
महिला दिन उत्साहात साजरा
बुधवारी भारतासह जगभरात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचे अधिकार आणि स्त्री-पुरुष समानता आदी विषयांवर चर्चासत्रे आणि इतर बहुविध कार्यक्रमही या निमित्ताने करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा संदेश दिले आहेत.









