भगवंत उद्धवाला जीवनमुक्तीची लक्षणे समजावून सांगत आहेत. ते म्हणाले, माणसाचा आत्मा शरीरातून मुक्त होऊन ईश्वरस्वऊपात विलीन झाला म्हणजे साधक जीवनमुक्त होतो. जीवनमुक्त झालेल्या साधकाचे जन्ममरणाचे फेरे चुकतात. हे सर्व कसे घडते ते सांगतो. सर्वप्रथम गुणातून मुक्त होणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व प्रकारे निरिच्छ होणे गरजेचे आहे. माझी निरपेक्ष भक्ती अधिकाधिक प्रेमाने केली की, अपरंपार सत्वशुद्धी होते. सत्वगुण हा ज्ञानाचा प्रकाशक आहे त्या प्रकाशाच्या योगाने साधकात आत्मज्ञान उत्पन्न होते आणि त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझी उपस्थिती जाणवते. अशा प्रकारे सत्वगुणाचे काम संपले की, तो आत्मरूपामध्ये लयास जातो. तीन गुण नाहीसे झाले म्हणजे केवळ निर्गुणच बाकी राहते. निर्गुणी साधकाला स्वत:चे असे कोणतेही कार्य उरत नाही. त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याने कार्य, कर्म आणि कारण ही त्रिपुटी नाहीशी होते. जर प्रारब्धाने आयुष्य शिल्लक असले, तर ते तो लोककल्याणासाठी व्यतीत करत असल्याने त्याला देहाभिमानाची बाधा नसते. त्याला बाहेरच्या गोष्टींचे काहीच आकर्षण नसल्याने तो बाहेरचे दृश्य पदार्थ पहात नाही. त्याच्या अंत:करणांत विषयाचे स्फुरण नसते व देहाचे देहपणही तो पाहात नाही. हेच जीवन्मुक्तीचे लक्षण होय. बाहेर दृश्य सुखाचा अनुभव घ्यावयाचा आणि हृदयात विषयांची आसक्ती धरावयाची, हे सर्व अज्ञानातून घडून येते. त्यामुळे हे शरीर म्हणजे मी असे आत्म्यास वाटत असते ही अविद्येची शक्ती असून बाधक आहे. माणसाला हे समजते पण स्वत:च्या शक्ती वापरून तो अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर पडू शकत नाही पण जो मला शरण येतो, माझी कास धरतो त्याचा मी निश्चित उद्धार करतो. गीतेतही अर्जुनाला मी हेच सांगितले आहे, माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा । कासेस लागले माझ्या ते चि जाती तरूनिया ।। 7 .14 ।। म्हणून अविद्येचे बंधन तोडण्याकरिता अगत्यपूर्वक माझे भजन करावे. हेच मनात आणून साधुसंतांनी भक्तीला प्राण विकलेला असतो. माझ्या भक्तीहून उत्तम अशी दुसरी गती नाही. माझे भजन अत्यंत श्र्रद्धेने केले असता समीपता, सलोकता, सरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती दासी होतात. माझे भजन जर अनन्यभावनेने केले असेल, तर मी श्रीकृष्ण त्याचा दास होतो. माझ्यावर जे मनापासून प्रेम करतात त्यांना परमार्थाचा लाभ होतो. माझ्या भक्ती करणाऱ्या पशुपक्ष्यांचाही मी उद्धार करितो, तर मनुष्यांनी भक्तिभावाने माझं भजन केल्यास मला त्यांना निजधामाला नेणे भागच आहे. ह्याकरिता विद्वत्ता एका बाजूस ठेवून जाणत्यांनी व नेणत्यांनी सर्वांनीच भाव धरून भगवद्भक्ति करावी, म्हणजे अनायासेच त्यांना आत्मस्वरूपाचा लाभ होतो. भाव धरून माझे भजन केले असता आपोआपच तिन्ही गुणांचा नाश होतो आणि आपले निर्गुणत्व आपोआप प्रकट होते. जो त्रिगुणांना वारून पुढे जातो. त्याच्याबाबतीत गुणांची गुंतागुंत संपते आणि त्याच्याठिकाणी आत्मशांती प्रकट होते. हेच या अध्यायाचे सर आहे. भगवंतानी हेही सांगितले की, स्वबळावर त्रिगुणांना जिंकणे अशक्मय आहे म्हणून ज्याला त्रिगुणांना जिंकायचे आहे त्याने भगवद्भक्ति करावी म्हणजे गुणांवर जय लाभतो आणि सहज आत्मशांती प्राप्त होऊन स्वत:सिद्धच आत्मस्वरूप प्राप्त होते. नाथमहाराजानी अशी आत्मस्वरूपाची भक्ती करून भगवंताना प्रसन्न करून घेतले. त्यामुळे चारही मुक्ती त्यांच्या दासी झाल्या आणि भगवंत स्वत: श्रीखंड्याच्या ऊपात पैठणात येऊन त्यांची सेवा करू लागले. नाथमहाराज म्हणतात, आत्मभक्ति ही मला मातेसारखीच पूज्य आहे. सद्गुरूंचे स्मरण करून ते म्हणतात, जनार्दन महाराजांनी मला त्या भक्तीजवळ पोचविले म्हणून त्यांच्या चरणांशी हा एकनाथ तल्लीन होऊन भजन करितो. येथे भागवताच्या एकादश स्कंधाचा पंचविसावा अध्याय संपला. पुढील अध्यायाबाबत सांगताना नाथबाबा म्हणतात, पुढच्या अध्यायातील ऐल-उर्वशी उपाख्यानाची कथा मोठ्या बहारीची आहे. या अध्यायाच्या पठणाने अगम्यागमनाचेही दोष नाश पावतात. त्यात पुरूरव्याच्या विरक्तीचे वर्णन श्रीकृष्ण आपल्या मुखाने करतील. त्या वैराग्याच्या योगाने निजात्मप्राप्ती होते.
अध्याय पंचविसावा समाप्त








