बिहारमध्ये मोठी दुर्घटना
वृत्तसंस्था/ गया
बिहारच्या गया जिल्हय़ात सणादिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. गया जिल्हय़ात सैन्याच्या प्रशिक्षणादरम्यान तोफगोळय़ाचा स्फोट झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तोफेतून डागण्यात आलेला तोफगोळा गया येथील फायरिंग रेंजबाहेरील गावात कोसळला. याचा स्फोट झाल्याने तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. तोफगोळय़ाचा स्फोट होताच पूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
गयामध्ये बुधवारी रंगपंचमीदिनीच ही मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बाराचट्टीमध्ये लोक सकाळपासूनच रंगपंचमी साजरी करत होते. अचानक तेथे लोकांदरम्यानच एक तोफगोळा येऊन पडला आणि त्याचा स्फोट झाला.
मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. तर दुर्घटनेनंतर पीडितांच्या कुटुंबीयांमध्ये शोक पसरला आहे.









