कारगिल हुतात्म्यांची नावे शरीरावर घेतली गोंदवून
महादेवाची नगरी काशीमध्ये सध्या एक युवक चर्चेचा विषय ठरला आहे. या युवकाच्या शरीरावर कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावे कोरली गेलेली आहेत. याचबरोबर शूर योद्धय़ांची चित्रेही त्याने शरीरावर काढून घेतली आहेत. या युवकाला पाहून प्रत्येक जण थक्क होत आहे. हुतात्म्यांबद्दल आदर आणि श्रद्धाभाव व्यकत करण्यासाठी अभिषेक नावाच्या या युवकाने हा मार्ग अवलंबिला आहे.

उत्तरप्रदेशच्या हापूड येथील रहिवासी असलेल्या अभिषेक गौतमने स्वतःच्या शरीरावर आतापर्यंत 631 हुतात्म्यांची नावे गोंदवून घेतली आहेत. यातील 559 नावे ही कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांची आहेत. याचबरोबर त्याने 72 हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या 72 हुतात्म्यांची नावेही त्याने शरीरावर कायमस्वरुपी गोंदवून घेतली आहेत.
माझ्या शरीरावर 11 महापुरुषांच्या चित्रांसह इंडिया गेट, हुतात्मा स्मारक आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या सैनिकांची नावे आहेत. हे टॅटू काढून घेण्यासाठी मला 11 दिवसांचा कालावधी लागल्याचे अभिषेकने सांगितले आहे.
पेशाने इंटीरियर डिझाइनर
अभिषेक हा पेशाने इंटीरियर डिझाइनर आहे. शरीरावर हुतात्म्यांच्या नावांचा टॅटू काढून घेण्याचा क्रम यापुढेही सुरूच राहणार आहे. देशासाठी वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा अनोखा प्रयत्न करत असल्याचे अभिषेकचे म्हणणे आहे. वाराणसीत अभिषेकच्या शरीरावरील हे टॅटू पाहून लोक त्याची प्रशंसा करत आहेत. अभिषेकने कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या घरातून माती जमा करत 2019 मध्ये कारगिल येथे पोहोचत कलश स्थापित केला होता. अभिषेकचा आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.









