अत्यंत अनोखा आहे हा क्लब
जगात दररोज अशा गोष्टी समोर येतात, ज्या जाणून घेतल्यावर चकित व्हायला होते. स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात लोकांच्या शरीराच्या तापमानातून पूर्ण इमारत उबदार ठेवण्याचे काम केले जात आहे. येथील एजीथ्री डब्ल्यू क्लबमध्ये येणाऱया लोकांच्या शरीरात निर्माण होणारी उष्णता साठवली जाते आणि यातून वीजनिर्मिती करत ती वेगवेगळय़ा कारणांसाठी वापरली जाते.
या पूर्ण यंत्रणेला बॉडी हीट नाव देण्यात आले आहे. हे डान्स फ्लोअरला एक छोटय़ा ऊर्जा निर्मिती केंद्रात बदलून टाकते. यादरम्यान प्रत्येक व्यक्ती नाचताना 150 ते 450 वॅट वीज निर्माण करत असतो. हे काम 2022 पासून केले जात आहे. क्लबिंगसोबत पर्यावरण रक्षणही करत असल्याने आम्हाला आनंद असल्याचे येथे येणाऱया लोकांचे म्हणणे आहे.

या पूर्ण यंत्रणेचे उद्दिष्ट जीवाश्म इंधनाचा वापर संपुष्टात आणणे आहे. उष्णता, म्युझिक इव्हेंट अणि क्लबसाठीची ऊर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. कार्बन फूटप्रिंट कमी करणे आणि वीज तसेच गॅसचा वापर कमी करण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे क्लबचे मॅनेजर बॉब जवाहिरी यांनी सांगितले आहे.
बॉडी हीट सिस्टीम
या क्लबच्या छतावर बसविण्यात आलेले व्हेंटिलेटर डान्स फ्लोअरवरून उष्ण हवा शोषून घेतात, यानंतर हीट पंप एक संवाहक द्रव्याचा वापर करत ही उष्ण हवा यार्डात पोहोचवितात, तथे याचा पुनर्वापर करण्यासाठी दोनशे मीटर खोल खड्डय़ात ही उष्ण हवा साठविली जाते आणि यातून वीजनिर्मिती केली जात असते. ही पूर्ण प्रक्रिया एक मिनिटापेक्षाही कमी वेळात पूर्ण होते. तीन वर्षांमध्ये ही सिस्टीम तयार करण्यात आली आहे.









