सुरुवात घसरणीत मात्र शेवट सकारात्मकतेने : सेन्सेक्स 124 अंकांनी मजबूत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील बुधवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स प्रारंभीच्या काळात घसरणीसोबत सुरु झाला होता. यानंतर बाजारात चढउताराचा कल राहिला होता. काहीवेळी सेन्सेक्स 139 अंकांनी वधारला होता, तसेच यावेळी निफ्टीनेही 17,700 चा टप्पा प्राप्त केला होता. परंतु अंतिम काही क्षणात सेन्सेक्समधील विविध कंपन्यांच्या कामगिरीमुळे बाजार सावरल्याचे दिसून आले.
यावेळी बाजारात रिलायन्सचे समभाग 10 टक्क्यांनी वधारुन बंद झाला असून अन्य कंपन्यांमध्ये अदानी समूह, पीएनबी हाऊसिंगचे समभाग तेजीसोबत बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये भारतीय एअरटेल,हिंदुस्थान युनिलिव्हर व नेस्लेचे समभाग काहीशा घसरणीसोबत बंद झाले.
जागतिक बाजारातील चढउतारानंतर त्याचा परिणाम हा भारतीय बाजारावर मोठा झाल्याचे दिसून आले. यामध्ये बुधवारी भारतीय बाजार हा सुस्तीसोबत खुला झाला. परंतु यामध्ये काहीशी सुधारणा होत तो दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 123.63 अंकांनी वधारुन निर्देशांक 60,348.09 वर बंद झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 42.95 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 17,754.40 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 17 समभागांमध्ये तेजी नोंदवली असून अन्य 13 समभाग काहीशा घसरणीत राहिले. यामध्ये इंडसइंड बँक, रिलायन्स, रिलायन्स पॉवर व अदानी इंटरप्राईजेस व अदानी पोर्ट्सचे समभाग तेजीत होते.
अन्य कंपन्यांमध्ये पीबी फिनटेक समभाग हे 4 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. यासोबतच फ्यूचर रिटेल, अपोलो ट्यूब्स, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, विप्रो, टायटन, एचसीएल टेक , टाटा मोर्ट्स, कोटक बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, सनफार्मा यांचे समभाग घसरणीत राहिले.
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढीचे संकेत तसेच राजकीय व आर्थिक घटना यांचा परिणाम हा भारतीय बाजारातील कामगिरीवर झाल्याचे दिसून आले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.









