वृत्तसंस्था/ अहमदाबाद
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील गुरुवार दि. 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविल्या जाणाऱया चौथ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे सोपविण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा नियमित कप्तान पॅट कमिन्स हा मायदेशी गेला असून त्याच्या आईची तब्येत ठिक नसल्याने तो आणखी काही दिवस भारतात येणार नाही.
या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने इंदूरचा तिसरा सामना केवळ अडीच दिवसात जिंकून मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. अहमदाबादची शेवटची कसोटी झाल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेत स्मिथ सहभागी होईल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलिया उशिरा घेणार आहे. स्मिथच्या नेतृत्वाखाली इंदूरच्या तिसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. आयसीसीच्या होणाऱया आगामी विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरी पात्रतेसाठी भारतीय संघाला शेवटचा अहमदाबादचा सामना जिंकणे जरुरीचे आहे. 17 मार्चपासून खेळविल्या जाणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी दुखापतग्रस्त जाय रिचर्डसनच्या जागी ऑस्ट्रेलियन संघात नाथन इलिसचा समावेश करण्यात आला आहे.









