न्यायालयाने दिली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मद्यधोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना येथील राऊस ऍव्हेन्यू न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांना आता तिहार कारागृहात नेण्यात आले आहे. त्यांच्या सीबीआय कोठडीचा कालावधी संपल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
त्यांच्या सीबीआय कोठडीत 3 दिवसांची वाढ करावी, अशी मागणी सीबीआयने केली होती. तथापि, न्यायालयाने ती मान्य केली नाही. त्यांना 26 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोनवेळा त्यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात आली होती. सिसोदिया यांनी रीतसर जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामिन अर्जावर 10 मार्चला कनिष्ठ न्यायालयात सुनावणी होणार आहे
मद्य व्यापाऱयांचा लाभ
काही मद्य व्यापाऱयांना अनुकूल ठरेल असे मद्यधोरण अवलंबिण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यांच्या काही कथित सहकाऱयांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मद्य व्यापाऱयांकडून मोठय़ा प्रमाणात रक्कम घेऊन ती गोवा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोगात आणली गेली असेही सीबीआयचे म्हणणे असून आता पुढील कारवाई केली जात आहे.
सहकार्य नसल्याचा आरोप
सिसोदिया हे सीबीआयच्या चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना संगतवार पद्धतीने देता आलेली नाहीत. तसेच अनेक प्रश्नांना उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले आहे. आता सीबीआय त्यांच्या तीन सहकाऱयांसह त्यांचा एकत्र जबाब घेणार आहे.
कडेकोट बंदोबस्त
सिसोदिया यांना न्यायालयात आणण्यात आले तेव्हा तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाकडे जाणारे काही मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. तसेच तिहार कारागृहातही त्यांना आणण्यात आल्यानंतर तेथे चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या औषधांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांची सखोल वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.









