आग आटोक्यात येण्याची चिन्हे नाही. मोठ्या प्रमाणात काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी
डिचोली. प्रतिनिधी
डिचोली तालुक्यातील मुळगाव या गावाच्या डोंगरावर शुक्र. दि. 3 मार्च रोजी लोगलेल्या आगीत डोंगरावरील काजू बागायती व इतर पिकांची पूर्णपणे नासाडी झालेली असून सदर डोंगर अजूनही म्हणजेच गेले 24 तास पेटतच आहे. सदर डोंगरावर जाण्यासाठी योग्य कच्चा किंवा पक्का रस्ता व्यवस्था नसल्याने डिचोली अग्निशामक दल हतबल बनले आहे. आतापर्यंत आठ ते दहा काजू बागायतदारांना या आगीचा फटक बसलेला आहे.
दरम्यान डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी मुळगाव व लाटंबार्से पंचायतींच्या सरपंचांना सदर प्रकरणाची चौकशी करून आग लावण्रायांची माहिती मिळवावी. प्रसंगी आग लावण्राया विरोधात तक्रारही दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार मुळगाव गावच्या डोंगरमाथ्यावर शुक्रवारी रात्री आग लागली होती. सदर आग नानोडा भागातून फैलावत मुळगावच्या डोंगरावर दाखल झाली. रात्री सदर आगीचे स्वरूप तेवढेही मोठे नव्हते. परंतु काल शनिवारी (दि. 4 मार्च) दिवसभर कडक उन आणि वारे यामुळे या आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचा वणवा बराच भडकला आणि सदर आग संपूर्ण डोंगरात पसरली. या डोंगरभागात असलेल्या मुळगावातील काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झालेले आहे.
सदर आग कशी व कोणी लागली याबाबत कोणालाही काहीच माहित नसून हि आग मात्र आटोक्यात आणणे अग्निशामक दलालाही जमलेले नाही. कारण या डोंगरावर जाण्यासाठी योग्य रस्ताच नाही. परिणामी सदर आग स्वत:हून नियंत्रणात येण्याची प्रतिक्षा करण्यावाचून कोणताही पर्याय अग्निशामक दलाचे जवान व बागायतदारांसमोर नाही. या आगीमुळे पिकलेल्या काजू झाडांची मोठी नासाडी झालेली आहे. सर्व पिक ख क झाले असून या मोसमात काजू बागायतदारांना मोठी नुकसानी सहन करावी लागणार. या बागायतदारांना सरकारने आता आधार करावा, अशी मागणी एक काजू बागायतदार संजय यशवंत राऊत यांनी केली आहे.
मुळगाव तसेच नानोडाच्या डोगरावरील आगीची आपणास जाणीव असून आपण दोन्ही पंचायतींच्या सरपंचांना आग लावणारी व्यक्ती व कारणे शोधण्यास सांगितले आहे. सध्याचा मोसम हा उकाड्याचा आहे. त्यातच कडक उन व वारे असतेच. त्यामुळे लोकांनी विशेषत: बागायतदारांनी आग लावण्याच्या भानगडीत पडूच नये. जर आग लावलीच तर समोर राहून ती जास्त फैलावणार नाही याची काळजी घ्यावी. या आगीच्या घटनेत नुकसान झालेल्या बागायतदारांनी जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी सांगितले.









