खोदाईकडे दुर्लक्षच, विकास शेतकऱ्यांच्या माथीच
प्रतिनिधी/ बेळगाव
बळ्ळारी नाला हा वडगाव, जुने बेळगाव, अनगोळ, शहापूर, मजगाव आणि येळ्ळूर परिसरातील शेतकऱ्यांना शापच ठरला आहे. या नाल्याची खोदाई करावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा निवेदने दिली. पालकमंत्र्यांनी आश्वासनही दिले. मात्र या नाल्याची खोदाई झालीच नाही. आता पुन्हा वळीव पावसांना लवकरच सुरुवात होणार असल्याने यावर्षी या नाल्याची खोदाई होणार नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे यावर्षीही बळ्ळारी नाला परिसरातील पिकांना फटका बसणार हे निश्चितच आहे.
शहराचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यात आला. मात्र शहराबरोबर उपनगर आणि शहराला लागून असलेल्या नाल्यांची दुरवस्था मात्र जैसे थे आहे. स्वच्छ नाले पूर्णपणे गढूळ झाले आहेत. आणि त्या नाल्यांना थेट ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे सर्वच नाले परिसरातील शेतकऱ्यांना आणि जनतेलाही अडचणीचे ठरु लागले आहेत. बळ्ळारी नाला हा तर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना त्रासाचा ठरत आहे. जाणूनबुजून या नाल्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
आता बळळरी नाल्यातील पाणी कमी झाले होते. मात्र या नाल्याला ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आल्याने त्या नाल्यामध्ये मैला तसेच पाणी साचून आहे. वास्तविक हा नाला साफ करणे महत्त्वाचे होते. मात्र नाला साफ करणे दुरच. त्यामध्ये ड्रेनेजचे पाणी सोडल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. दरवर्षी वडगाव, जुनेबेळगाव आदी भागातील शेतकऱ्यांना नाल्याच्या पुराचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी बळ्ळारी नाल्यात जानेवारी महिन्यापर्यंत बऱ्यापैकी पाणी असते. त्यामुळे रब्बी पिके व उन्हाळी पिके घेण्यासाठी काही प्रमाणात या नाल्यातील पाण्याचा वापर केला जात होता. मात्र आता या नाल्याजवळ उभे राहणेदेखील अशक्य झाले आहे.









