ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरकडून मालिकेतील खेळपट्ट्यांवर टीका, गडबड केल्याचा संशय
वृत्तसंस्था/ इंदूर – मेलबर्न
इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दोन दिवसांत नऊ गडी राखून भारतावर मात केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने खेळपट्टीला ‘खराब’ ठरविले आहे. ‘खराब’ रेटिंगमुळे इंदूरच्या वाट्याला तीन ‘डिमेरिट पॉइंट्स’ आले आहेत आणि ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी सक्रिय राहतील. नागपूर आणि नवी दिल्ली येथील खेळपट्ट्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने ‘सर्वसाधारण’ ठरविले होते.
आयसीसी सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी सल्लामसलत केल्यानंतर आपल्या चिंता व्यक्त करत अहवाल आयसीसीला सादर केला आहे. हा अहवाल बीसीसीआयकडे पाठवण्यात आला असून त्यांच्याकडे आता वरील निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी 14 दिवस आहेत. खूप कोरडी असलेली सदर खेळपट्टी फलंदाजी नि गोलंदाजी यांच्यात समतोल साधणारी नव्हती. सुऊवातीपासूनच ती फिरकीपटूंना अनुकूल होती, असे ब्रॉड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या तीन खेळपट्ट्यांवर भरपूर टीका केली असून अशा खेळपट्ट्यांच्या तयारीत काही प्रमाणात गडबड केली गेली असावी, असा आरोप केला आहे. ‘आयसीसी’ने इंदूरच्या खेळपट्टीचा दर्जा खराब ठरविल्यासंदर्भात बोलताना टेलरने, मी त्याशी सहमत आहे, असे म्हटले आहे.
मला निश्चितपणे वाटते की, या मालिकेसाठीच्या खेळपट्ट्या खराब होत्या. प्रामाणिकपणे सांगायचे तर, इंदूरची खेळपट्टी या तिघांपैकी सर्वांत वाईट होती. पहिल्या दिवशीच खेळपट्टी इतकी बिघडते यावर माझा विश्वास बसत नाही, असे टेलरने म्हटल्याचे ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने दिले आहे. खेळ लांबला, तर ते चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी तुम्हाला समजेल, पण पहिल्या दिवशी नाही. ही फक्त खराब तयारी आहे. मला वाटते की, इंदूरची खेळपट्टी खूप खराब होती आणि त्यानुसार तिचा दर्जा ठरवायला हवा’, असे टेलरने पुढे म्हटले आहे.
गावस्करने दिले गब्बाचे उदाहरण
दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्करने मात्र इंदूरच्या खेळपट्टीला ‘खराब’ ठरविल्याबद्दल टीका केली आहे. गब्बाच्या खेळपट्टीचे उदाहरण देताना गेल्या डिसेंबरमधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी दोन दिवसांच्या आत संपली, तरीही आयसीसीने ‘सर्वसाधारणपेक्षा कमी’ असा दर्जा दिला होता, याकडे गावस्करने लक्ष वेधले आहे.
पण टेलर त्याकडे सहमत नाही. ब्रिस्बेनची खेळपट्टी दोन्ही बाजूंसाठी समान प्रकारची होती. सध्या चालू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या तीन कसोटी सामन्यांच्या खेळपट्ट्या वेगळ्या राहिलेल्या असून त्या खास फिरकी गोलंदाजांसाठी तयार करण्यात आल्या होत्या, असे त्याने म्हटले आहे. ‘मला वाटते की, त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे. कारण लोक या हंगामात गब्बाचे उदाहरण देतात. ती तेथील ग्राउंड्समनची चूक होती. त्याने त्यावर खूप गवत सोडले. पण एक प्रकारे ते कुठल्याही एका संघाला अनुकूल नव्हते. ते दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना तितकेच अनुकूल ठरले असते. कारण त्यांच्याकडे चार चांगले वेगवान गोलंदाज आहेत, याकडे त्याने लक्ष वेधले.
म्हणून मला वाटत नाही की, गब्बा येथे कोणतीही गडबड केली गेली. पण इंदूरमध्ये जे घडले ते पाहता खेळपट्टी इतकी खराब पद्धतीने तयार केली गेली की, त्यामुळे सामना लॉटरीसारखा बनला, जो भारताला अजिबात अनुकूल ठरला नाही. त्यात ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज भारताला जितके वाटले होते त्यापेक्षा खूप जास्त परिणामकारक ठरले, असे मत टेलरने व्यक्त केले आहे.









