जामीन अर्जावरील निर्णय 10 मार्चपर्यंत सुरक्षित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदियांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने शनिवारी दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना 6 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. त्याचवेळी सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर न्यायालय 10 मार्च रोजी निर्णय देणार आहे.
सिसोदिया यांना शनिवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने न्यायालयाकडे तीन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, त्यांना दोन दिवसांचीच अतिरिक्त कोठडी मंजूर करण्यात आली. सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. रिमांडची मुदत 4 मार्चला समाप्त झाली होती.
सीबीआयने सिसोदिया यांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने आता काय उरले आहे? अशी विचारणा सीबीआयच्या वकिलांना केली. यावर युक्तिवाद करताना सीबीआयने मनीष सिसोदिया यांची रोज रात्री 8 वाजेपर्यंत चौकशी केली जात आहे, मात्र ते तपासात सहकार्य करत नाहीत. अजूनही त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे घ्यायची आहेत,. याशिवाय त्यांची या खटल्यातील काही साक्षीदारांसमोर आमने-सामने चौकशीही करावी लागणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, सिसोदिया यांची बाजू मांडणारे ज्ये÷ वकील दयान कृष्णन यांनी त्यांच्या कोठडी वाढवण्यास विरोध केला. ‘आम्ही आरोपांच्या कबुलीची वाट पाहत आहोत’, या आधारावर सीबीआय रिमांड मागू शकत नाही, असा युक्तिवाद दयान यांनी केला. प्रत्येक वेळी तपासात सिसोदिया यांच्याकडून असहकाराचा दावा करून ते रिमांड मागू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी वाढवली.
मानसिक छळ होत असल्याचा सिसोदियांचा दावा
तुम्हाला कोठडीत काही अडचण आहे का? अशी विचारणा सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी सुनावणीदरम्यान सिसोदिया यांना केली. यावर उत्तर देताना सिसोदिया यांनी मला शारीरिकदृष्टय़ा कोणतीही समस्या नाही. जेवणही वेळेवर मिळते, पण अधिकारी मला तेच-तेच प्रश्न वारंवार विचारून मानसिक त्रास देत आहेत. या छळातून मला वाचवा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर न्यायालयाने सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.









