सुकृत मोकाशी / पुणे :
भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसब्यात मविआने धक्का दिल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कोथरुडचा निकाल काय असणार, याबाबत आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यामध्ये पोटनिवडणूक लागली. मविआने रवींद्र धंगेकर यांना, तर भाजपाने हेमंत रासने यांना तिकीट दिले. यामध्ये धंगेकरांनी रासने यांचा दहा हजार मतांनी पराभव केला. ब्राह्मण समाजाची नाराजी हे रासने यांच्या पराभवामागील एक कारण मानले जाते. आत्तापर्यंत कसब्यामध्ये भाजपाने रामभाऊ म्हाळगी, अरविंद लेले, अण्णा जोशी, गिरीश बापट, मुक्ता टिळक या ब्राह्मण समाजातील लोकांना उमेदवारी देऊन त्या मतदारसंघातील ताकद ओळखली होती. पण, यावेळेस कसब्यात रासने यांना उमेदवारी दिल्याने ब्राह्मण समाजात नाराजी होती. ब्राह्मण समाजातही आपल्याला डावलल्याची भावना निर्माण झाली होती. याआधी कोथरुडमध्येही मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळेसपासूनचा ब्राह्मण समाजात असलेला राग कसबा पोटनिवडणुकीत उफाळून आला आणि भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला, असे मानले जाते.
कसब्याच्या निकालावरून धडा घेऊन भाजपाने कोथरुडमध्ये सुज्ञ उमेदवार देणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कसब्याप्रमाणेच कोथरुड विधानसभा मतदारसंघातही भाजपाचे प्राबल्य राहिले आहे. कोथरुडमध्येही ब्राह्मण समाज मोठय़ा प्रमाणावर आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना 98235 इतकी मते मिळवली होती. त्या जवळजवळ 65 हजार मतांनी निवडून आल्या होत्या. तर, 2019 च्या निवडणुकीत त्यांना डावलून कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना भाजपाने तिकीट दिले. त्यावेळी भाजपाच्या मताधिक्यात घट झाली होती. पाटील हे 25 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. बाहेरचा उमेदवार पक्षाने दिला होता. त्याचाही फटका भाजपला बसला. आगामी विधानसभेत कोथरुडमध्ये भाजपाने योग्य उमेदवार दिला नाही, तर कोथरुडचा गडही हातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार बदलणार, का विद्यमान आमदारांनाच पुन्हा तिकीट मिळणार, याबाबत आत्तापासूनच चर्चा सुरू आहे.
अधिक वाचा; राहुल गांधींच्या डोक्यातच पेगासस : अनुराग ठाकूर








