बेळगाव : अˆ व नागरी पुरवठा खात्याने नवीन बीपीएल आणि अंत्योदय कार्ड वितरणाला मंजुरी दिली आहे. मात्र हे वितरण विस्कळीत झाले आहे. आठवड्यातील ठराविक दिवसच रेशनकार्ड वितरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतीक्षेत राहावे लागत आहे. मागील दोन वर्षांत नवीन रेशनकार्ड वितरणाचे काम विस्कळीत होत आहे. काहीकाळ काम सुरू तर काहीकाळ ठप्प होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना रेशनकार्डसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्ह्यात बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्ड लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान शासनाकडून मासिक रेशनचा समाधानकारक पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्ड मिळविणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. तर काहीजण खोटी माहिती पुरवून रेशनकार्ड मिळवित आहेत. अशा बोगस लाभार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत रेशनकार्ड वितरणाचे काम चालत आहे. त्यामुळे रेशनकार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास विलंब होत आहे. दरम्यान, अनेकांना रेशनकार्डपासून वंचित राहावे लागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा रेशनकार्ड वितरणाचे काम ठप्प होणार आहे. यासाठी आचारसंहितेपूर्वीच नवीन रेशनकार्डे वितरित करण्यात यावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. रेशनकार्ड वितरणात सर्व्हर डाऊनचाही व्यत्यय निर्माण होत आहे. त्यामुळे कामात अडथळा येऊ लागला आहे. त्यामुळे रेशनकार्ड वितरणाचे काम संथगतीने होत आहे. परिणामी लाभार्थ्यांना रेशनकार्डच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे.









