वृत्तसंस्था/ मियामी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे 21 मार्चपासून खेळविल्या जाणाऱया 2023 च्या मियामी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सीडेड तसेच या स्पर्धेतील विद्यमान विजेती इगा स्वायटेक त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम विजेती साबालेन्का सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एमा राडुकानूला वाईल्डकार्डद्वारे स्पर्धा आयोजकांनी प्रवेश दिला आहे.
गेल्या वषी या स्पर्धेत स्वायटेकने माजी टॉप सीडेड जपानच्या नाओमी ओसाकाचा 6-4, 6-0 असा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. एकाच वर्षातील टेनिस हंगामात इंडियन वेल्स आणि मियामी येथील टेनिस स्पर्धा जिंकणारी स्वायटेक ही सर्वात तरुण महिला टेनिसपटू ठरली. महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत स्वायटेकने आपले आघाडीचे स्थान 47 आठवडे कायम राखले आहे. मियामी टेनिस स्पर्धेत जेसिका पेगुला, जेबॉर, सोफिया किनेन, कॅरोलिना गार्सिया, कोको गॉफ, मारिया सॅकेरी, कॅसेटकिना, बेन्सिक, रिबेकिना, कुडेरमेटोव्हा, बियाट्रिझ हदाद माइया, सॅमसोनोव्हा, अझारेंका, क्विटोव्हा, प्लिस्कोव्हा, बेडोसा आणि ओस्टापेंको सहभागी होत आहेत.









