वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू तसेच दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचे प्रशिक्षक आणि फिटनेस टेनर यांना केंद्रीय क्रीडा युवजन खात्याच्या मिशन ऑलिम्पिक सेलने (एमओसी) आर्थिक साहाय्याला मंजुरी दिली आहे.
विधी चौधरी सिंधूचे प्रशिक्षक असून श्रीकांत मदपल्ली हे फिटनेस टेनर आहेत. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या होणाऱया अखिल इंग्लंड चॅम्पियनशीप, स्वीस खुल्या तसेच स्पेन मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांसाठी पी. व्ही. सिंधू समवेत विधी चौधरी आणि श्रीकांत मदपल्ली यांना पाठविले जाणार आहे. या विविध स्पर्धांसाठी मिशन ऑलिम्पिक सेलने त्यांच्या आर्थिक खर्चाला मंजुरी दिली आहे. व्हिसा, हवाई प्रवास खर्च, निवास, त्याचप्रमाणे आहारासाठी लागणाऱया खर्चाला मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धांसाठी प्रशिक्षक आणि फिटनेस टेनरला प्रत्येक दिवसाचा भत्ता व इतर खर्चासाठी रक्कम दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे भारताचा अव्वल नेमबाज अनिश बनवाला जर्मनीमध्ये विदेशी प्रशिक्षक राल्फ स्कूमन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव आणि प्रशिक्षण घेणार आहे. या प्रशिक्षणासाठी बनवालाला आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी 28 दिवसांचा असून बनवाला मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात जर्मनीला रवाना होणार आहे.









