170 जणांना वाचविण्यात आले
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
हाँगकाँगच्या सिम शा सुई जिल्हय़ात एका 42 मजली इमारतीला आग लागली आहे. आग अत्यंत भीषण असल्याने ती विझविण्यास अग्निशमन दलाला 9 तासापर्यंत प्रयत्न करावे लागले आहेत. शॉपिंग एरियामध्ये असलेल्या या इमारतीत नुतनीकरणाचे काम सुरू होते. याचदरम्यान लागलेल्या आगीने उग्र रुप धारण केले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्वरित धाव घेतल्याने जीवितहानी टळली आहे. गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजता या इमारतीत आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 250 कर्मचाऱयांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर शुक्रवारी सकाळी 8 वाजता आगीवर नियंत्रण मिळविले आहे. दुर्घटना रात्री उशिरा घडल्याने परिसरात फारसे लोक नव्हते, 170 लोकांना आम्ही सुरक्षितस्थळी हलविले असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱयाने सांगितले आहे.
संबंधित इमारतीत एक मोठा क्लब आणि लक्झरी हॉटेल होते. या पूर्ण इमारतीचे नुतनीकरण केले जात होते. याकरता 2019 मध्ये पुनर्विकास प्रकल्पाला स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली होती. हे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार होते असे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.









