फॉक्सकॉन करणार 5.7 हजार कोटींची गुंतवणूक : 1 लाख रोजगार होणार उपलब्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील आयफोन निर्मितीची क्षमता आगामी काळात आणखीन मजबूत केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये आता आयफोन निर्मितीचा प्रकल्प बेंगळूर येथे लवकरच उभारण्यात येणार असून याकरीता अॅपलचे भागीदार फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूह स्थानिक उत्पादन वाढविण्यासाठी जवळपास 5.7 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अंदाजे 1 लाख इतका रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती ब्लूमबर्गने आपल्या एका अहवालामधून दिली आहे.
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे उत्पादन चीनमधून भारतात स्थलांतरीत करण्यात येत आहे. राजकीय तणाव आणि कोरोना महामारीनंतर अॅपलसह इतर अमेरिकन टेक दिग्गज चीनच्या बाहेर त्यांच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी काम करीत आहेत. संभाव्य प्रकल्प उभारणी हा त्यामधीलच एका भाग आहे.
याशी संबंधित लोकांनी सांगितले की, तैवानच्या कंपनीकडून बेंगळूरमधील विमानतळाच्या 300 एकर जागेवर प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. या कारखान्यात अॅपलचे हॅण्डसेटही असेंबल केले जाणार आहेत. फॉक्सकॉन नवीन इलेक्ट्रिक वाहन व्यवसाय या प्रकल्पात करणार आहे.
इतकी रोजगार निर्मिती होणार
भारतामध्ये या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आल्यानंतर जवळपास एक लाख इतकी मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती आहे. दोन लाख कर्मचारी हे सध्या झेंगझोऊ, चीनमधील मोठ्या आयफोन असेंब्लीत काम करत आहेत.









