वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रधानमंत्री गतिशक्ती उपक्रमांतर्गत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे पाच लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची शिफारस करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
यामध्ये विविध मंत्रालयांच्या 66 मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या पीएम गतिशक्ती उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने (एनपीजी) या प्रकल्पांची शिफारस केली आहे.
इन्स्टिट्यूट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी) च्या विशेष सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, प्रत्येक मंत्रालयाने पीएम गतीशक्तीचा अवलंब केला पाहिजे. गतीशक्ती संकल्पना विस्तारणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन योजना लाँच केली होती. सुमिता
डावरा यांनी येथे सांगितले की, 66 मोठे प्रकल्प (प्रत्येकी 500 कोटींहून अधिक किमतीचे) ज्यांची एकूण किंमत सुमारे पाच लाख कोटी रुपये आहे.
या प्रकल्पांमध्ये 6,931 कोटी रुपयांचा गुरुदासपूर-जम्मू-श्रीनगर नैसर्गिक वायू पाइपलाइन, 30,502 कोटी रुपयांचा चेन्नई-त्रिची-तुतीकोरीन एक्स्प्रेस प्रकल्प आणि 922 कोटी रुपयांचा मारवाड औद्योगिक वसाहत या प्रकल्पांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.









