दिवसभर उकाडा तर पहाटे थंडी : विचित्र हवामानामुळे रुग्णसंख्येत वाढ : उन्हाळा-थंडीमुळे आजार
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर आणि तालुका परिसरात वातावरणातील बदलाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भर दुपारी उष्म्यात वाढ होत असतानाच रात्री व पहाटे थंडी पडत आहे. यामुळे नागरी आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. उन्हाळ्याची सुऊवात झाली असताना थंडी पडत आहे. यामुळे अनेकांना आजारपण येऊ लागले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरासह ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला आणि फ्ल्यू रुग्णांची संख्या वाढत आहे.
ऑक्टोबर ते जानेवारी हा थंडीचा मोसम मानला जातो. फेब्रुवारी अखेरपासून उष्म्याची चाहुल लागते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ऋतुचक्रामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. आता पहाटेच्या वेळी थंडी पडत आहे तर दिवसभर उकाडा जाणवत आहे. रात्रीही थंडी पडत आहे. कडाक्याचे ऊन आणि त्यानंतर थंडी यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
आरोग्याचा प्रश्न निर्माण
या वातावरणातील बदलामुळे नागरिकांसमोर आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या सर्दी, खोकला आणि तापाचे ऊग्ण वाढू लागले आहेत. उष्णता आहे म्हणून शितपेये किंवा थंड पाण्याचा वापर सध्या जोरात सुरू आहे. दरम्यान, उकाडा घालविण्यासाठी रात्रीच्या वेळी पंखा किंवा एसी लावणाऱ्यांची मात्र थंडीमुळे झोप उडू लागली आहे. यामुळे हा उन्हाळा की हिवाळा असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. अलीकडच्या चार-पाच वर्षात शहर आणि परिसरात हवामान बदलाचे वेगवेगळे प्रकार नागरिकांना पाहावयास मिळत आहेत. सध्या दिवसा उन्हाळा आणि रात्री हिवाळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दवाखान्यांमध्ये ऊग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उष्णतेच्या विकारांबरोबरच हवामान पालटाचा फटका बसलेले ऊग्ण दवाखान्यांमध्ये जास्त आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर दरवषी पावसाचा शिडकावा होतो. शिवाय मार्चच्या अखेरीनंतर किंवा एप्रिलच्या पूर्वार्धापासून वळीव दाखल होतो. यंदा नेमके असेच होणार का? याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. एकूणच हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे त्याचा फटका साऱ्यांनाच बसू लागला आहे.
पिकांना बदलत्या हवामानाचा फटका सध्या शेतकरी रब्बी काढणीच्या कामामध्ये गुंतला आहे. मसूर, वाटाणा, गहू, मोहरी ही पिके काढून मळणी करत आहे. बऱ्याच ठिकाणी हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यातच कडाक्याचे ऊन सोसावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू लागला आहे. यावर्षी मसूर तसेच इतर पिकांना बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. रब्बी पेरणीनंतर पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांनाही यावर्षी फटका बसला आहे.









