तिसरी कसोटी दुसरा दिवसः 8 बळी टिपणाऱया लियॉनसमोर भारताचा दुसऱया डावात 163 धावांत धुव्वा, पुजाराचे अर्धशतक, कांगारूंना विजयासाठी 76 धावांचे किरकोळ आव्हान

वृत्तसंस्था /इंदोर
चेतेश्वर पुजाराने अर्धशतक नोंदवले तरी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफस्पिनर नाथन लियॉनच्या भेदक माऱयासमोर भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा लोटांगण घातल्याने त्यांना मायभूमीत दुर्मीळ पराभवाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱया दिवशी 197 धावांत गुंडाळल्यानंतर भारताचा दुसरा डाव 163 धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 76 धावांची किरकोळ आव्हान मिळाले. लियॉनने 64 धावांत भारताचे 8 बळी मिळविले. भारताने दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव झटपट गुंडाळत चांगली सुरुवात केली होती. 4 बाद 156 धावांवरून सुरुवात करणाऱया ऑस्ट्रेलियाचे उर्वरित सहा फलंदाज आणखी 41 धावांची भर घालून बाद झाले. पहिल्या डावात 197 धावा जमवित त्यांनी भारतावर 88 धावांची महत्त्वाची आघाडी मिळविली. त्यानंतर भारताचा दुसरा पुन्हा एकदा फिरकीसमोर गडगडला आणि 60.3 षटकांत 163 धावांत आटोपल्याने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचे किरकोळ आव्हान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाला भारतात दुर्मीळ विजय मिळविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांत भारताने मायभूमीत केवळ दोन कसोटी गमविल्या आहेत.

भारताच्या दुसऱया डावात फक्त पुजाराने फिरकीसमोर दर्जेदार फलंदाजी करीत शानदार अर्धशतक नोंदवले. स्टीव्ह स्मिथने लेगस्लिपमध्ये एक अप्रतिम झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. पुजाराने 142 चेंडूत 5 चौकार, एक षटकारासह 59 धावा जमविल्या. मात्र त्याला भारताच्या इतर फलंदाजांकडून पुरेशी साथ मिळाली नाही. फिरकीसमोर पुन्हा एकदा त्यांनी शरणागती पत्करल्याचे दिसून आले. पुजारा असेपर्यंत भारताला मोठी धावसंख्या रचण्याची अपेक्षा होती. पण दिवसाचा खेळ संपण्याच्या सुमारास स्मिथने त्याचा सनसनाटी झेल टिपत त्याला माघारी धाडले आणि भारताच्या मोठी आघाडी घेण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. लियॉनने भेदक फिरकीवर भारताचे 8 फलंदाज बाद केले. सिराज शेवटच्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. लियॉनला स्लॉग स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्न हुकला आणि तो त्रिफळाचीत झाल्यानंतर दिवसाचा खेळ संपवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि त्यांचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार झाले. विशेषतः पुजारा व श्रेयस अय्यर (26) यांच्या अप्रतिम झेलामुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळविता आले. भारतीय फलंदाजांचे शॉट सिलेक्शन पुन्हा एकदा चुकल्याचे दिसून आले. शुबमन गिल (5) व विराट कोहली (13) चुकीच्या फटक्यावर बाद झाले. चहापानावेळी 4 बाद 79 अशा स्थितीनंतर पुजारा व अय्यर यांनी प्रतिहल्ला करीत 35 धावांची भागीदारी केल्याने भारताच्या फाईटबॅकच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण उस्मान ख्वाजाने मिडविकेटवर उंच झेपावत अय्यरचा अप्रतिम झेल टिपत या आशाही संपुष्टात आणल्या. अय्यरने आडव्या बॅटने फटका मारला, त्यावर ख्वाजाने अप्रतिम झेल टिपला. गिल दुसऱयांदा अपयशी ठरला. लियॉनला उत्तुंग फटका मारताना तो त्रिफळाचीत झाला. लियॉनने कर्णधार रोहित शर्मालाही 12 धावांवर पायचीत पेले.
500 बळी व 5000 धावा बनविणारा जडेजा भारताचा दुसरा अष्टपैलू

स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा एकंदर 500 बळी व 5000 धावांचा टप्पा गाठणारा भारताचा दुसरा खेळाडू बनला आहे. तिसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने हेडला पायचीत करीत हा माईलस्टोन गाठला. कसोटीतील हा त्याचा 260 वा बळी होता. याशिवाय त्याने 171 वनडेमध्ये 189 बळी आणि 64 टी-20 सामन्यांत 51 बळी मिळविले आहेत. फलंदाजीत त्याने कसोटीमध्ये 2619, वनडेमध्ये 2447, टी-20 मध्ये 457 धावा जमविल्या आहेत. याआधी कपिलदेवने 131 कसोटीत 434, 225 वनडेत 253 बळींसह एकूण 687 बळी मिळविले. फलंदाजीत त्याने कसोटीत 5248 व वनडेत 3783 धावा जमविल्या आहेत. या यादीत अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश असून त्यात कॅलिस, शॉन पोलॉक, इम्रान खान, वासिम अक्रम, शाहिद आफ्रिदी, इयान बोथम, चमिंडा वास, डॅनियल व्हेटोरी, शकिब अल हसन यांचा समावेश आहे.
मायदेशात उमेश यादवचे बळींचे ‘शतक’

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवने मायदेशात शंभर बळींचा टप्पा पूर्ण करण्याचा मान मिळविला. यादव व अश्विन यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविल्यामुळे दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांत आटोपला. फिरकीस अनुकूल असणाऱया खेळपट्टीवर 3 बळी मिळविणारा उमेश यादव हा दोन्ही संघातील एकमेव वेगवान गोलंदाज ठरला. त्याने तीन षटकांत 3 बळी मिळविले. त्याचे आता भारतात खेळलेल्या 31 कसोटीत 101 बळी झाले आहेत. त्याने 24.53 धावांच्या सरासरीने हे बळी मिळविले आहेत. हा माईलस्टोन गाठणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज आहे. याआधी कपिल देव (219), जे. श्रीनाथ (108), झहीर खान (104), इशांत शर्मा (104) यांनी हा पराक्रम केला होता.
अश्विनने कपिलला मागे टाकले

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आणखी एक भारतीय विक्रम नोंदवला असून त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक बळी मिळविणाऱया कपिल देवला मागे टाकले आहे. अश्विनने ऍलेक्स कॅरेला बाद करून कपिलचा 687 बळींचा विक्रम मागे टाकला. अनिल कुंबळे या यादीत आघाडीवर असून त्याने 953 बळी मिळविले आहेत. त्यानंतर हरभजन सिंग 707 बळी मिळवित दुसऱया स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत प.डाव सर्व बाद 109, ऑस्ट्रेलिया प.डाव सर्व बाद 197 ः हेड 9, ख्वाजा 60, लाबुशेन 31, स्मिथ 26, हँडस्कॉम्ब 19 (98 चेंडूत 1 चौकार), ग्रीन 21 (57 चेंडूत 2 चौकार), कॅरे 3, स्टार्क 1, लियॉन 5, मर्फी 0, कुहनेमन नाबाद 0, अवांतर 22. गोलंदाजी ः अश्विन 3-44, जडेजा 4-78, उमेश यादव 3-12, सिराज 0-13, अक्षर पटेल 0-33.
भारत दु.डाव 60.3 षटकांत सर्व बाद 163 ः रोहित शर्मा 12, गिल 5, पुजारा 59 (142 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), कोहली 13 (26 चेंडूत 2 चौकार), श्रेयस अय्यर 26 (27 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), एस. भरत 3, अश्विन 16 (28 चेंडूत 2 चौकार), अक्षर पटेल नाबाद 15 (39 चेंडूत 1 षटकार), उमेश यादव 0, सिराज 0, अवांतर 7. गोलंदाजी ः लियॉन 8-64, कुहनेमन 1-60, स्टार्क 1-14, मर्फी 0-18.









