देवराष्ट्रे वार्ताहर
यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यामध्ये बुधवारी एका सांबर जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अभयारण्याच्या पुर्व बाजूस दरीमध्ये हे हरिण मृत अवस्थेत आढळले. याबाबत अभयारण्य प्रशासनाशी संर्पक केला असता हरिण मृत्यूबाबत कोणतीही माहीती नसल्याचे सांगण्यात आले.
सागरेश्वर अभयारण्यात गत दोन तीन महिन्यापूर्वी एका हरणाचा मृत्यू झाला होता. तर अभयारण्याबाहेर चार्याच्या शोधात असलेल्या दुसर्या हरणाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत तीन हरणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
सागरेश्वर अभयारण्य हरिणांसाठी प्रसिध्द आहे. येथे हरिणांची संख्या मोठी आहे. परंतु अभयारण्यात हरिणांना पुरेसा चारा नाही. सुरक्षेसाठी असलेले अभयारण्याचे कुंपन ठिकठिकाणी तुटले आहे. या तुटलेल्या कुंपनातुन हरणे चार्याच्या शोधात बाहेर पडत असुन मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी पडत आहेत. तर अनेकवेळा मोकाट कुत्र्यीही अभयारण्यात प्रवेश करत आहेत. अभयारण्याच्या प्रशासनाकडुन याकडे डोळेझाक होत असुन वरिष्ठ अधिकारीही अभयारण्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. अभयारण्यात मृत्यूमुखी पडलेल्या हरणाची माहितीच अभयारण्य प्रशासनाला नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.








