6 ते 40 टक्क्मयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव : मालमत्ताधारकांना आक्षेप नोंदविण्याची सूचना
बेळगाव ; कॅन्टोन्मेंट हद्दीतील मालमत्तांचा कर वाढविण्याचा प्रस्ताव बोर्डने तयार केला आहे. याबाबत मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या असून मालमत्तांची वर्गवारी करून 6 ते 40 टक्क्मयांपर्यंत करवाढीचा प्रस्ताव आहे. नोटिसा बजावलेल्या मालमत्ताधारकांना आक्षेप नोंदविण्याची सूचना करण्यात आली आहे. पण आक्षेप नोंदवला तरी करवाढ निश्चित आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने दर तीन वर्षांतून एकदा मालमत्ता करात वाढ केली जाते. तीन वर्षे पूर्ण झाल्याने यंदा करवाढ करण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डने केला आहे. त्याकरिता कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंटने मालमत्तांची वर्गवारी केली असून त्यानुसार करवाढ करण्यात येत आहे. रहिवासी मालमत्तांच्या करात 6 टक्क्मयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. तर व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक, उच्च व्यावसायिक, बंगलो, खुल्या जागा आणि सरकारी इमारतींसाठी करवाढ निश्चित करण्यात आली आहे. 6 ते 40 टक्क्मयांपर्यंत वर्गवारीनुसार करवाढ केली जाणार आहे. करवाढीच्या प्रस्तावाबाबत हरकत नोंदविण्यासाठी प्रत्येक मालमत्ताधारकांना सात दिवसांची मुदत देण्यात येते. करवाढीबाबत कोणताही आक्षेप असल्यास सात दिवसांच्या आत नोंदविण्याची सूचना करण्यात आली आहे. या आक्षेपाबाबत कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी केली जाते. सुनावणीवेळी मालमत्तांचा कर निश्चित केला जातो.
कॅन्टोन्मेंटच्या कायद्यानुसार करवाढ निश्चित
सध्या महागाई वाढल्याने नागरिकांना करवाढीचा फटका सोसावा लागणार आहे. मागील चार वर्षांत कोरोनामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अशातच आता करवाढीच्या भूर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे. करवाढीबाबत मालमत्ताधारकांनी आक्षेप घेतला तरी कॅन्टोन्मेंटच्या कायद्यानुसार करवाढ निश्चित आहे.









