घरगुती गॅस सिलिंडर 50 ऊ.नी महागला : सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका
बेळगाव
गॅस सिलिंडर दरात भरमसाट वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडर 50 ऊपये तर व्यावसायिक सिलिंडर दर 342 ऊपयांनी महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईने जनता होरपळत आहे, त्यातच गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर आता गॅसपेक्षा आपली चूलच बरी म्हणण्याची वेळ आली आहे. वर्षभरात गॅस दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. इंधन दरवाढीबरोबर गॅसचे दर वाढल्याने आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. खाद्यतेल, दूध, डाळी आदी वस्तुंबरोबर गॅसदर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. व्यावसायिक गॅसदरातही वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल आणि इतर व्यावसायिकांच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. रशिया-युव्रेन युद्धादरम्यान गॅस दरात भरमसाट वाढ झाली होती. त्यानंतर गॅस दर काहीसे कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा दरवाढ झाल्याने गोरगरिबांच्या स्वयंपाकाला चटका बसणार आहे. घरगुती गॅसदरात 50 ऊपयांनी वाढ झाल्याने तो 1112 ऊपयांवर पोहोचला आहे. व्यावसायिक गॅसदरात 342 ऊपयांनी वाढ झाल्याने तो 2152 ऊपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांना गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
जनता महागाईच्या कचाट्यात
इंधन आणि इतर किराणा मालाच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यातच गॅस दर वाढल्याने जनता महागाईच्या कचाट्यात सापडली आहे. आता घरगुती गॅससाठी 50 ऊपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे गृहिणीची चिंता वाढली आहे.









