मजगावातून सोडण्यास विरोध
बेळगाव : संपूर्ण ब्रह्मनगर वसाहत व परिसरातील शेतवडीचे दूषित पाणी सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची आणि पाच फूट खोलीची काँक्रिटची गटार बांधून गणपत गल्ली, मजगावला जोडल्यास मजगावातील सर्व घरांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र विरोध केला असून पारंपरिक पद्धतीने शेतवडीचे पाणी गावाबाहेरून थेट व•ाजवळील नाल्याला जोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर दूषित पाणी गावात आल्यास रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मजगावात भुयारी गटारी नसल्याने डेंग्यू, उलटी, जुलाब हे आजार कायम ठाण मांडून आहेत. त्यामध्ये ब्रह्मनगरचे दूषित पाणी मजगावात सोडल्यास पुन्हा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून ब्रह्मनगरचे पाणी परस्पर गावाबाहेरून नाल्याला जोडणी करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









