पुणे / वार्ताहर :
मागील काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या पोटनिवडणुकीत कोण विजयी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम गोदामात हेत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील मध्यभागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास देखील पोलिसांनी मनाई केली आहे.
निकालानंतर संभाव्य अनुचित घटना आणि कार्यकर्त्यांमधील वाद टाळण्यासाठी पोलिसांकडून मतमोजणीच्या ठिकाणी तसेच शहराच्या मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, काशेवाडी भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवला जाणार आहे. याशिवाय कोरेगाव पार्क येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तर विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून समाजमाध्यमांवर देखील पोलिसांचे लक्ष राहणार आहे. गैरप्रकार तसेच आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे लक्ष राहणार आहे. निकालापूर्वी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली असून, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.








