सर्वांनी 31 मार्चपर्यंत बिले फेडावीत ; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची सूचना
पणजी : वीज खात्याने वीज थकबाकीदारांना वीज बिले भरण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 28 फेब्रुवारी ऐवजी आता 31 मार्चपूर्वी थकबाकीदारांनी वीज बिले फेडवीत, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले. वीज खात्याच्या विविध माध्यमातून रु. 350 कोटी येणे बाकी आहे. ही वाढती थकबाकी अडचणीत आणणारी ठरत आहे. वीज खात्याला विविध सामग्री खरेदी करावयाची असल्याने वीज ग्राहकांनी बिले त्वरित भरण्याची गरज होती. यामुळेच ज्यांची बिले थकलेली आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तसेच त्यांची कनेक्शने ठेवायची की नाही? असा प्रश्न वीज खात्याला पडला आहे. त्यामुळेच वीजग्राहकांना आम्ही त्यांची थकबाकी फेडण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत काल संपली, मात्र आजपासून नव्याने 1 महिन्यासाठी मुदतवाढ मिळवून दिली आहे. आता दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या कालावधीत ग्राहकांनी वीजबिले फेडणे आवश्यक असल्याचे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.









