तिसरी कसोटी ः पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, कुहनेमनचे 5, लियॉनचे 3 बळी
वृत्तसंस्था/ इंदोर
भारतीय फलंदाजांचा फिरकीविरुद्धचा संघर्ष पूर्णपणे एक्स्पोज करून दाखवताना आखsलियाने तिसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा केवळ 109 धावांत फडशा पाडल्यानंतर फलंदाजीत सुधारित कामगिरी करीत दिवसअखेर 4 बाद 156 धावा जमवित सामन्यावर नियंत्रण मिळविले. ऑस्ट्रेलियाचे स्पिनर्स मॅथ्यू कुहनेमन व नाथन लियॉन यांनी 5 व 3 बळी मिळविले. नंतर फलंदाजीत उस्मान ख्वाजाने शानदार अर्धशतक नोंदवत 60 धावा जमविल्या.
डावखुरा स्पिनर कुहनेमनने सर्वोत्तम कामगिरी करताना पहिल्यांदा पाच बळी मिळविले. त्याने केवळ 16 धावांत भारताचे 5 गडी बाद केले. फिरकीवर आक्रमण करण्याचा भारतीय फलंदाजांचा डाव फसल्याचे यावेळी दिसून आले आणि भारताचा पहिला डाव उपाहारानंतर काही वेळातच 109 धावांत संपुष्टात आला. अतिशय फिरकी घेणारी व बाऊन्समध्ये वैविध्य असणाऱया खेळपट्टीवर भारतीय फलंदाज झगडताना दिसून आले. या परिस्थितीचा ऑस्ट्रेलियन स्पिनर्सनी पुरेपूर लाभ उठवला. विराट कोहलीने भारतातर्फे 52 चेंडूत सर्वाधिक 22 धावा जमविल्या.
भारताची ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात नोंदवलेली ही चौथ्या क्रमांकाची तर एकंदर आठवी निचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी 2004 मध्ये मुंबई कसोटीत 104 व 105, त्यानंतर 2017 मध्ये पुण्यामधील कसोटीत 107 धावा भारताने जमविल्या होत्या. तशी ही भारताची ही एकंदर संयुक्त 29 वी निचांकी धावसंख्या आहे.

ऑस्ट्रेलियाचे सुधारित प्रदर्शन
0-2 असे पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटीत फिरकीसमोर शरणागती पत्करल्याचे दिसून आले होते. पण यावेळी निर्धारी खेळ करीत त्यांनी 4 बाद 156 धावा जमवून भारतावर 47 धावांची आघाडी घेत पहिल्याच दिवशी सामन्यावर नियंत्रण मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाचे चारही बळी रवींद्र जडेजाने 63 धावांत मिळविले. त्यात हंगामी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या बळीचाही समावेश आहे. स्मिथने 38 चेंडूत 26 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे उस्मान ख्वाजाने सर्वोत्तम प्रदर्शन करीत शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने जडेजा व अश्विन यांचा हुशारीने व सरळ बॅटने खेळत समर्थपणे मुकाबला केला.

मार्नस लाबुशेननेही बऱयापैकी फलंदाजी केली. त्याने 91 चेंडूत 31 धावा केल्या. त्याआधी तो एकदा नोबॉलवर बाद झाला होता. याचा फायदा घेत त्याने ख्वाजासमवेत 96 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून या मालिकेत नोंदवलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. नेहमी अचूक मारा करणारे भारतीय स्पिनर्स यावेळी दिशा व टप्पा यामध्ये सातत्य ग्नग्नग्नग्नराखू शकले नाहीत. याशिवाय ख्वाजा व लाबुशेन यांनी स्वीप फटके मारण्याच्या चुकीची दुरुस्ती करीत सरळ खेळण्यावर आणि डिफेन्सवर जास्त भरवसा दाखवला. भारतीय संघ खेळताना खेळपट्टी ‘अनप्लेयेबल’ वाटत होती. पण ख्वाजा व त्याच्या सहकाऱयांनी त्यावर कसे खेळावे, याचा धडाच भारतीय फलंदाजांना दिला. ख्वाजाने दोन शानदार ड्राईव्ह्ज मारले तर रिव्हर्स स्वीप मारण्यातही हयगय केली नाही. मात्र सरळ बॅटनेच तो जास्त वेळ खेळत होता. मात्र 43 व्या षटकात त्याच्याकडून एक चूक झाली, ती त्याला महाग पडली. जडेजाला त्याने स्वीपचा फटका मारला आणि डीप मिडविकेटवर तो झेलबाद झाला. त्याने 147 चेंडूंच्या खेळीत केवळ 4 चौकार मारले. या खेळपट्टीवर 100-124 धावांची आघाडीही मोठी ठरणार असून नागपूर व दिल्लीतील कसोटीप्रमाणे ही कसोटीही तीन दिवसांत संपण्याची शक्यता आहे.

भारताचा डाव गडगडला
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा रोहितचा निर्णय चुकल्याचे त्याच्या सहकाऱयांनी दाखवून दिले. उपाहाराआधीच भारताचे 7 फलंदाज तंबूत विसावले होते. उपाहारानंतर आणखी केवळ 25 धावांची भर घालत उर्वरित फलंदाजही बाद झाले. शमीला विश्रांती देऊन त्याच्या जागी घेतलेल्या उमेश यादवने 13 चेंडूत 17 धावा फटकावल्यामुळेच भारताला शंभरी पार करता आली. भारताचे तीन फलंदाज रोहित शर्मा (12), जडेजा (4), श्रेयस अय्यर (0) आक्रमक फटके मारताना बाद झाले. कोहली आश्वासक खेळत होता, पण त्यालाही मर्फीने पायचीत केले. मर्फीने या मालिकेत तिसऱयांदा कोहलीला बाद केले आहे. राहुलच्या जागी घेण्यात आलेला शुबमन गिल 18 चेंडूत 21 धावा काढून स्लिपमध्ये झेलबाद झाला. रोहित शर्मा पुढे सरसावत खेळताना यष्टिचीत झाला. तो पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला होता. पण ऑस्ट्रेलियाने यावेळी रिव्हय़ू घेतला नाही. त्यामुळे तो बचावला. पुजारा केवळ 4 चेंडू टिकला. त्याला लियॉनने एका धावेवर त्रिफळाचीत केले. श्रेयसने कुहनेमनला कट करण्याच्या प्रयत्नात चेंडू यष्टय़ांवर ओढवून घेतला. 45 धावांतच भारताचा निम्मा संघ गारद झाला होता.
ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात स्टार्क व ग्रीन यांना संधी दिली. स्टार्कने सुरुवातीला भेदक मारा करीत रोहितला अडचणीत आणले होते. सहा षटकानंतर फिरकी मारा सुरू केल्यानंतर त्यांनी धुमाकूळ घालत भारतीय फलंदाजांना लवकर गुंडाळण्यात यश मिळविले. लियॉनने कुहनेमनला पूरक साथ देत 35 धावांत 3 तर मर्फीने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः भारत पहिला डाव 33.2 षटकांत सर्व बाद 109 ः रोहित शर्मा 12 (23 चेंडूत 3 चौकार), गिल 21 (18 चेंडूत 3 चौकार), पुजारा 1, कोहली 22 (52 चेंडूत 2 चौकार), जडेजा 4, श्रेयस 0, श्रीकर भरत 17 (30 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अक्षर पटेल नाबाद 12 (33 चेंडूत 1 चौकार), आर. अश्विन 3, उमेश यादव 17 (13 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), सिराज 0, अवांतर 0. गोलंदाजी ः कुहनेमन 5-16, लियॉन 3-35, मर्फी 1-23, स्टार्क 0-21, ग्रीन 0-14.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 54 षटकांत 4 बाद 156 ः ट्रव्हिस हेड 9 (6 चेंडूत 1 चौकार), उस्मान ख्वाजा 60 (147 चेंडूत 4 चौकार), लाबुशेन 31 (91 चेंडूत 1 चौकार), स्मिथ 26 (38 चेंडूत 4 चौकार), हँडस्कॉम्ब खेळत आहे 7, ग्रीन खेळत आहे 6, अवांतर 17. गोलंदाजी ः जडेजा 4-63, अश्विन 0-40, अक्षर पटेल 0-29, उमेश यादव 0-4, सिराज 0-7.









