वृत्तसंस्था/ दुबई
‘आयसीसी’च्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत जेम्स अँडरसनचा शिखरावरील मुक्काम संपुष्टात आला असून भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. अश्विनने त्याच्या अलीकडील कामगिरीमध्ये सहा बळी घेत गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. दुसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या दणदणीत विजयात मोलाचा वाटा उचलताना त्याने ही कामगिरी केली होती. दुसरीकडे, वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केल्यानंतर अँडरसन दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
36 वषीय अश्विनने सर्वांत प्रथम 2015 मध्ये कसोटी गोलंदाजांतील प्रथम स्थान पटकावण्याचा मान मिळवला होता आणि तेव्हापासून अनेक वेळा तो अव्वल स्थानावर परतलेला आहे. अश्विनने दिल्लीतील भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी करताना पहिल्या डावाच्या एकाच षटकात मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांचा अडथळा दूर केला आणि पुढे अॅलेक्स पॅरीला शून्यावर बाद केले. या ऑफस्पिनरने त्यानंतर दुसऱ्या डावात पहिल्या पाचपैकी तीन फलंदाजांना बाद केले. ऑस्ट्रेलियाविऊद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेतील भारताच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून पहिल्या क्रमांकावर टिकून राहण्याची अश्विनला चांगली संधी आहे.
मागील तीन आठवड्यांचा विचार करता या क्रमवारीत अग्रस्थान मिळविलेला अश्विन हा तिसरा गोलंदाज आहे. गेल्या वेळी अँडरसनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची जागा घेतली होती. अश्विन, अँडरसन व कमिन्स या तिघांनी ताज्या क्रमवारीत अव्वल तीन गोलंदाजांमध्ये स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा 40 वषीय वेगवान गोलंदाज अँडरसन न्यूझीलंडविऊद्धच्या पहिल्या कसोटीतील त्याच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजीतील क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता. परंतु त्यानंतर तो सात रेटिंग गुणांनी घसरून 859 वर आला आहे आणि दुसऱ्या स्थानावर आहे. या अनुभवी खेळाडूने दुसऱ्या कसोटीतही प्रभाव पाडला असला, तरी तो आता अश्विनपेक्षा पाच रेटिंग गुणांनी मागे आहे. अश्विन 864 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दुसऱ्या कसोटीतील 10 बळींमुळे रवींद्र जडेजाला गोलंदाजांच्या क्रमवारीत बढती मिळून तो आठव्या स्थानावर आला आहे आणि कसोटीतील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीच्या अव्वल स्थानावरील त्याची पकड आणखी मजबूत झाले आहे. या क्रमवारीत अश्विन त्याच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा ज्यो रूट हा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दोन स्थानांनी बढती मिळून आठव्या स्थानावर पोहोचला आहे. रूटला वेलिंग्टनमध्ये पुन्हा फॉर्म गवसल्याने तो कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड आणि बाबर आझम यांना मागे टाकून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचे मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ हे कसोटी फलंदाजांमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत









