उष्णतेपासून वाचण्यासाठी अजब उपाययोजना
अमेरिका विकसित आणि समृद्ध देश असल्याने येथील रस्ते चांगले आहेत असे नाही, तर रस्ते उत्तम आहेत म्हणून अमेरिका विकसित आणि समृद्ध असल्याचे उद्गार जॉन एफ. केनेडी यांनी काढले होते. कुठल्याही देशाच्या विकासात तेथील रस्त्यांचे योगदान मोठे असते. जगातील बहुतांश ठिकाणी आपण रस्ते काळय़ा रंगात पाहतो. भारतात सर्वत्र काळय़ा रंगातील रस्ते पहायला मिळतील. परंतु एका देशात रस्ते हे काळय़ा रंगाचे नसून निळय़ा रंगातील आहेत.

कतारची राजधानी दोहामध्ये तुम्हाला निळय़ा रंगातील रस्ते दिसून येतील. काळय़ा रंगाच्या तुलनेत निळय़ा रंगाच्या रस्त्यांवर तापमान 20 टक्क्यांपर्यंत कमी होते. तापमान मोजण्यासाठी रस्त्यांवर रितसर सेंसर बसविण्यात आले आहेत. कतारमध्ये अलिकडेच फूटबॉल विश्वचषक पार पडला आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक सुविधांची निर्मिती करण्यात आली होती.
कतारची राजधानी दोहामध्ये जुन्या रस्त्यांना निळय़ा रंगाने रंगविण्यात आले आहे. येथील रस्त्यांना निळा रंग देण्यामागे कारण देखील महत्त्वपूर्ण आहे. तापमान नियंत्रित करण्यास सुविधा व्हावी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. जागतिक तापमानवाढीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर कतारने रस्त्यांना निळा रंग देण्याचा एक प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला आहे. रस्त्यांना निळा रंग दिल्याने उष्णता नियंत्रित करण्यास मदत होणार असल्याचे संशोधकांचे मानणे आहे.









