दोन संशयितांना अटक ; सीआयडीने केल्या कारवाया

पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) बाणस्तारी व पोरस्कडे पेडणे अशा दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 3 लाख 15 हजार ऊपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. दोन्ही संशयितांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. सीआयडी विभागाला मिळालेल्या माहितीवरून, निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील सीआयडी पथकाने रॉयल ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, पोरस्कडे, पेडणे येथे अमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या नासीर हुसेन, (23 सावंतवाडी, सिंधुदुर्ग महाराष्ट्र) याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 5 हजार ऊपये किंमतीचा 2.50 किलो ग्रॅम इतका गांजा जप्त केला. संशयित गोव्यात गांजाचा पुरवठा करण्यासाठी येणार असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला शिताफीने रंगेहाथ अटक केली. दुसऱ्या एका कारवाईत सीआयडी पोलिसांनी बाणास्तरी जंक्शन येथे फ्लायओव्हरच्या खाली संशयित सुकेश कुमार (24) याच्याकडून 1 लाख 10 हजार ऊपये किंमतीचा 1 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला. संशयित मूळ कोरैया, चेपकिया, धनबाद, झारखंड, येथील असून तो सध्या शाहीन कॉन्ट्रॅक्टर सरस्वती मंदिराजवळ वेरे, बेती गोवा येथे राहत होता. संशयित गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला शिताफीने रंगेहाथ अटक केली. दोन्ही प्रकरणे वेगवेगळी नोंद करून दोन्ही संशयितांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीआयडीचे उपनिरीक्षक सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी पालीस पुढील तपास करीत आहेत.









